मुंबईच्या राजकीय वर्तुळात शनिवारी सकाळी अचानक स्फोटक हलचल निर्माण झाली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी असा दावा केला की, महाविकास आघाडीचं सरकार उलथवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आलेलं सध्याचं सरकार एका ‘हनीट्रॅप’ प्रकरणामुळे आणि ‘नाशिकच्या सीडी’मुळेच सत्तेत आलं. या विधानाने राज्याच्या राजकारणात वादळ उठवलं आहे.
वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट शब्दांत म्हटलं, मुख्यमंत्री म्हणाले, ‘ना हनी आहे, ना ट्रॅप’, पण खरा सत्तांतराचा धागा एका सीडीशी जोडलेला आहे. नाशिकमधील एका प्रकरणामुळेच हे सरकार आले. त्या सीडीमध्ये अनेक मोठी नावं आहेत. आयएएस अधिकारी, माजी प्रशासनातील लोक आणि उच्चभ्रू व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधी पक्षाकडून सरकारवर दबाव आणण्याचे संकेत दिसू लागले आहेत.
Prakash Ambedkar : जनसुरक्षेच्या नावाखाली अघोषित आणीबाणीचा खेळ
आम्हालाच तिकीट लावावं लागेल
या स्फोटक आरोपांमध्ये वडेट्टीवार यांची शैली गूढ आणि सावध होती. त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की, आमच्याकडे इतका ठोस पुरावा आहे की, जर तो दाखवायचा म्हटलं, तर आम्हालाच तिकीट लावावं लागेल. आणि तो फक्त निवडक लोकांनाच दाखवता येईल इतका स्फोटक आहे. हे विधान म्हणजे केवळ राजकीय टीका नव्हे, तर थेट सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उभं करणारा इशारा होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेल्या हनीट्रॅपच्या आरोपांना हसण्यावारी नेलं होतं. “ना हनी आहे, ना ट्रॅप, नाना पटोलेंचे बॉम्ब पोहोचलेच नाहीत, असं म्हणत त्यांनी आरोप फेटाळले. पण आता वडेट्टीवारांच्या नव्या दाव्याने हा विषय पुन्हा गरम झालाय. हसण्यावारी गेलेले आरोप आता प्रत्यक्ष सीडीच्या संदर्भाने अधिक गंभीर वाटू लागले आहेत.
सीडी नक्की कोणाची
राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा आहे, ती सीडी नक्की कोणाची आहे?, ‘त्यात काय आहे?’, ‘कोणत्या अधिकाऱ्यांचा किंवा राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे?’ आणि सगळ्यात महत्वाचं, ‘जर ती सीडी सत्तापालटाचं कारण असेल, तर लोकशाही व्यवस्था एवढ्या सहजपणे ढासळू शकते का?’ हे प्रश्न आता उभे राहिले आहेत.
वडेट्टीवार यांनी हे ही स्पष्ट केलं की, आम्ही कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावणं पसंत करत नाही. म्हणून शांत आहोत. पण जर गरज भासली तर आमच्याकडे पुरावे आहेत. त्यांच्या या वक्तव्याने असा संकेत दिला आहे की, विरोधकांकडे संपूर्ण माहिती असून ती योग्य वेळी बाहेर काढली जाऊ शकते. संपूर्ण घटनेत वडेट्टीवार केंद्रस्थानी आहेत. त्यांचं वक्तव्य हे एकतर काँग्रेसच्या रणनीतीचा भाग आहे, किंवा प्रत्यक्षात काही गंभीर गोष्टींची सुरुवात. अनेकांचे मत आहे की वडेट्टीवार हे अशा वक्तव्यांमधून एक प्रकारचा ‘सॉफ्ट ब्लॅकमेल’ करत असून सरकारला सावधगिरी बाळगायला भाग पाडत आहेत..
राज्याच्या सत्तास्थापनेला आधार ठरलेली ‘सीडी’ जर खरोखर अस्तित्वात असेल आणि त्यात सत्ताधाऱ्यांशी संबंधित गंभीर गोष्टी असतील, तर ती महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवू शकते. काँग्रेसकडून ती सीडी कधीच बाहेर येणार, की ही फक्त राजकीय खेळी आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच, वडेट्टीवारांनी टाकलेला ‘सीडी बॉम्ब’ आता सत्ताधाऱ्यांना अस्वस्थ करू लागला आहे. आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक नवा प्रश्न घर करून बसला आहे, सीडी जर सत्तेचा पाया असेल, तर ही सत्ता लोकशाही आहे की ब्लॅकमेलशाही?”