
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयावर गंभीर आरोप होत आहे. एका महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर आणि मंगेशकर कुटुंबीयांवर टीकेचा भडिमार झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा थेट आरोप करत रुग्णालयाच्या ‘धर्मदाय’तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर धर्मदाय रुग्णालयावर सध्या टीकेची झोड उठली असून, एका महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे रुग्णालय प्रशासन आणि मंगेशकर कुटुंबीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट आरोप करत रुग्णालयाच्या ‘धर्मदाय’ संबोधनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी विचारलं, जेथे पैसे दिल्याशिवाय उपचारच होत नाहीत, ते रुग्णालय धर्मदाय कसे असू शकते?

पत्रकारांशी संवाद साधताना वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले की, महिलेवर वेळेत उपचार झाले असते, तर तिचा जीव वाचू शकला असता. मात्र, उपचारासाठी आर्थिक अडथळा निर्माण करण्यात आला. यावर मी जे भाष्य केलं, त्यावर टीका होत आहे. परंतु मला त्याची तमा नाही, सत्य समोर येणारच. वडेट्टीवारांनी दीनानाथ रुग्णालयातील व्यवहार फक्त सामान्य नागरिकांपुरते मर्यादित नाहीत, हे अधोरेखित करत एक धक्कादायक किस्सा उघड केला. वडेट्टीवारांनी म्हटले की, थोर समाजसेवक, ‘महाराष्ट्र भूषण’ डॉ. प्रकाश आमटे कर्करोग उपचारासाठी या रुग्णालयात दाखल झाले. तेव्हा व्यवस्थापनाने सांगितले की, त्यांच्याकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. मात्र, प्रत्यक्षात औषधांच्या नावाखाली पाच लाख रुपये उकळण्यात आले. जर आमटे यांना ही वागणूक मिळत असेल, तर सामान्य माणसाचं काय?
लाखोंचा सांगितला खर्च
वडेट्टीवार यांची टीका इथेच थांबली नाही. त्यांनी थेट दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्यावरही गंभीर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, लता मंगेशकर यांनी नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाच्या कार्यक्रमात मोफत गायन करण्याचे आश्वासन दिले होते. संघाने तयारी पूर्ण करून संपर्क साधला असता, त्यांनी पंचतारांकित हॉटेल, खासगी विमान व इतर व्यवस्थांसाठी 22 लाख रुपयांचा खर्च सांगितला. संस्थेने धनादेश देण्याची तयारी दर्शवली, परंतु त्यांनी रोख रकमेचा आग्रह धरला. संस्था असल्याने हे शक्य नव्हते आणि अखेर कार्यक्रम रद्द करावा लागला.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, एका खासदाराने लता मंगेशकर यांना साहित्य संमेलनासाठी निमंत्रित केले असता, त्यासाठी त्यांनी दोन लाख रुपये मागितले. नंतर आणखी तीन लाखांची मागणी केली असल्याचाही गौप्यस्फोट वडेट्टीवारांनी केला. इतकंच नव्हे, जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत आशा भोसले यांना गायनासाठी निमंत्रण होतं. तरीही लता मंगेशकर यांनी कार्यक्रमात गायन करून मानधन स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी केला.
वडेट्टीवारांनी थेटपणे सांगितलं, मंगेशकर कुटुंब कोणतेही कार्य पैशाशिवाय करत नाही. मग ते रुग्णालय असो वा कार्यक्रम. मी फक्त सत्य सांगत आहे. जेव्हा समाजसेवकांनाही सन्मान न देता केवळ पैसा कमावण्याचा हेतू ठेवला जातो, तेव्हा धर्मदाय रुग्णालयाची संकल्पनाच मुळातून डगमगते. हे वक्तव्य राजकीय व सांस्कृतिक वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण करत आहे. मंगेशकर कुटुंबीय आणि रुग्णालय प्रशासनाकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.