स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी वाचनसंस्कृती आणि सांस्कृतिक विकासाचे शस्त्र उपसत, तरुणांना अभ्यास व सुसंस्कारांचा मार्ग सुचवला. ‘वाचाल तर वाचाल’चा मंत्र देत त्यांनी ग्रामविकासाच्या नव्या दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला.
मोबाईलच्या कचकचीत काळात जेव्हा तरुणाई डिजिटल दुनियेत अडकली आहे, तेव्हा रत्नापूरसारख्या ग्रामीण भागात वाचन संस्कृतीच्या पुनर्जन्माचा ऐतिहासिक क्षण घडला. महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय आणि श्री गुरुदेव सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी गावकऱ्यांना फक्त पायाभूत सुविधा नव्हे, तर सामाजिक आणि बौद्धिक समृद्धीचा संदेश दिला.
सध्याच्या धावपळीच्या आणि ‘स्क्रोल’प्रधान काळात वाचनसंस्कृती दिवसेंदिवस गळत चालली आहे. त्यात ग्रामीण तरुणाईची सवयी बदलत चालल्या आहेत. काही ठिकाणी तर युवक व्यसनांच्या विळख्यात अडकत आहे. यामुळे त्यांच्या भवितव्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी ‘वाचाल तर वाचाल’चा मंत्र पुन्हा ऐकवला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…’ हे उद्गार आठवून देत वाचनसंस्कृतीचा जागर केला.
Devendra Fadnavis : विकास थांबायला वेळ नाही, मुख्यमंत्र्यांचा डेडलाईन धमाका
गावातील सुप्त रत्न
वाचनालय म्हणजे पुस्तकांचं दालन नाही, तर स्वप्नांची प्रयोगशाळा आहे, असा सूर यावेळी उमटला. रत्नापूरमधील या नव्या वाचनालयात अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा असून, गावातील सुप्त ‘रत्न’ इथून तयार होऊन बाहेर पडावीत, असेही वडेट्टीवार म्हणाले. त्यांचा रोख स्पष्ट होता की, शिक्षण, वाचन आणि सामाजिक जाणीव यांचा संगमच ग्रामीण परिवर्तनाचे गमक ठरू शकतो.
विकासाचा मुद्दा अधोरेखित करताना वडेट्टीवारांनी म्हटलं की, आपला भाऊ म्हणून मी कटिबद्ध आहे. यामध्ये भाऊगिरीचा भावनिक नारा होता, पण त्यामागे आगामी राजकीय समीकरणांचं संकेतही दडलेलं होतं. महापालिका निवडणुकींचा सध्याचा सुगावा पाहता, मतदारसंघात ‘संवेदनशील विकास’ हा एक नव्याने उभा राहत असलेला मुद्दा असल्याचं या उपक्रमातून दिसतं.
सांस्कृतिक अधिष्ठान
सांस्कृतिक सभागृह हे केवळ लग्न किंवा कार्यक्रमासाठी जागा न राहता, ग्रामीण भागात सामाजिक समांतर उभं करण्याचा एक उपाय ठरू शकतो. शेतकरी कुटुंबांना कमी खर्चात कार्यक्रम साजरे करता यावेत यासाठी ही सोय पुरवण्यात आली आहे. हे सभागृह आणि वाचनालय मिळून गावातील सामाजिक आणि सांस्कृतिक चैतन्य पुन्हा फुलवतील, अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे.
वाचनालय हे फक्त पुस्तके ठेवण्याची जागा नसून, ती एका पिढीचं भविष्य घडवणारी कार्यशाळा असते. त्यामधून केवळ स्पर्धा परीक्षा नव्हे तर विचारांच्या स्पर्धेसाठीही तयार होता येतं. याच दृष्टीने हा प्रकल्प उपयुक्त ठरू शकतो, असं मत अनेक ग्रामस्थांनी नोंदवलं.