
पहलगाम हल्ल्यावरून सरकारला धारेवर धरणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर आपली भूमिका दुरुस्त केली आहे. पाकिस्तानविरोधात ठाम पाऊल उचलल्यास काँग्रेस नक्की पाठिंबा देईल असं ते म्हणाले.
पहलगाममधील भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात रोषाची लाट उसळली होती. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा आपले विकृत अस्तित्व दाखवले आणि त्यावर भारत कधी कारवाई करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गेले काही दिवस देशभरात चर्चेचा विषय होता, भारत काहीतरी मोठं पाऊल उचलणार का? सुरक्षा यंत्रणांनी विविध शहरांमध्ये मॉकड्रिल जाहीर केल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. सरकार नक्की काय करणार याबाबत अंदाज बांधले जात होते.
काही विरोधी पक्षांनी ही कारवाई पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोपही केला होता. पण, या सर्व संशयांना पूर्णविराम देत, भारतीय सेनेनं मॉकड्रिलच्या आदल्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर घातक क्षेपणास्त्र हल्ला केला. भारतीय हवाई सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर अचूक आणि प्रभावी हल्ला करत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईमुळे पहलगाम हल्ल्याचे मास्टरमाइंड्स हादरून गेले आहेत. आता भारतानेही त्यांच्या भाषेत उत्तर दिलंय, अशी प्रतिक्रिया आता जनमानसातून उमटते आहे.

देशासाठी एकजूट हवी
सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ऑपरेशन सिंदूरवर त्यांनी भारतीय सेनेचे आणि केंद्र सरकारचे समर्थन करत, भारतीय नागरिकांना न्याय मिळावा यासाठी झालेली ही कारवाई योग्यच आहे, असं ठाम मत मांडलं. पहलगाम हल्ल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर कडवट टीका केली होती. दहशतवाद्यांकडे धर्म विचारण्याची मुळात वेळ असते का? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
ऑपरेशन सिंदूरनंतर मात्र त्यांनी आपली भूमिका बदलत केंद्र सरकारच्या पावलांना पाठिंबा दिला आहे. जर सरकारनं पाकिस्तानविरोधात कायमस्वरूपी निर्णय घेतला, तर काँग्रेसही त्यामागे खंबीरपणे उभी राहील, असं स्पष्ट करत त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर एकजूट दाखवली आहे. देशहितासाठी राजकारण बाजूला ठेवण्याचा काँग्रेसचा संदेश या विधानातून स्पष्ट होतो. ऑपरेशन सिंदूर’नंतर लगेचच केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी उपस्थित आहेत.
बैठकीत भारताच्या भविष्यातील धोरणांवर मंथन सुरू आहे. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आता सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊ लागल्याचे चित्र या बैठकीतून स्पष्ट झाले. भारत पुन्हा एकदा एकसंघ होऊन दहशतवादाच्या विरोधात उभा ठाकला आहे.