
सध्या गाजत असलेल्या बीड येथील हत्या प्रकरणाला वेगळं वळण मिळणार आहे. याप्रकरणी एन्काऊंटर होऊ शकतं असा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
बीड येथील संतोष देशमुख प्रकरणाला वेगळी कलाटणी लागू शकते. याप्रकरणातील मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पुरावा नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी याबाबत आपल्याशी संवाद साधल्याचंही ते म्हणाले. वाल्मीक कराडचे सध्या पोलिस कोठडीमध्ये लाड सुरू असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. पोलिसांनी कराडसाठी कॉटची व्यवस्था केली होती, असं ते म्हणाले.
कराडसाठी पोलिस ठाण्यामध्ये कॉट पोहोचला. पोलिस ठाण्यात कॉट कसा पोहोचला असा सवाल त्यांनी केला. हा कॉट कशासाठी पोहोचला, याची चौकशी करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या बीड मधील प्रकरणावरून काहीही बोलत नाहीत. त्यांचे मौन पाहता मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते, अशी शक्यता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. मुंडे यांची विकेट काढून टीम मध्ये छगन भुजबळ यांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? असा प्रश्न गेल्या चार-पाच दिवसापासून आम्हाला पडत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

अनेक Serious आरोप
धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. नी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील वाढत आहे. मुंडे यांच्या जागी मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. छगन भुजबळ यांच्या बाबत अजित पवार निर्णय घेतील. मंत्रिमंडळामध्ये खात्यांवरून रणकंदन सुरू असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला. अनेक मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी उशीर केला. आता पदभार घेण्यासाठी देखील उशीर होत आहे. 26 जानेवारी पर्यंत पालकमंत्री पद वाटप होईल, असे म्हटले जाते. मात्र इतके दिवस कशासाठी? असं ते म्हणाले.
पालकमंत्री पदाचे वाटप लवकरात लवकर करायला हवे. पाशवी बहुमत मिळून देखील मंत्रिमंडळ धड चालत नाही. पालकमंत्री नेमले जात नाहीत. बंगले वाटपावरुन देखील भांडण सुरू आहे. जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा, असं वडेट्टीवार यांनी नमूद केलं. बीड मधील पोलिस हे वाल्मीक कराडलाच बॉस म्हणून वागवतात. जिल्हाधिकारी आणि एसपींचा देखील हाच अनुभव असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. हत्येच्या 22 दिवसानंतर देखील आरोपीला अटक होत नाही. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यायला हवे, असे वडेट्टीवार म्हणाले.