महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू आहे. यातच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस फोडा असा मंत्र दिल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण राज्यात काँग्रेसच्या वतीने सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता आणि संविधान बचावाचा संदेश देणारी सद्भावना पदयात्रा काढण्यात येत आहे. राज्यातील ढासळती कायदा-सुव्यवस्था, वाढता जातीयवाद आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा शहराच्या मध्यवर्ती भागांतून काढण्यात आली.
राज्यभरातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी तळपत्या उन्हात सहभाग घेतल्याने परभणी शहरात चांगलाच उत्साह बघायला मिळाला. यात्रेमध्ये सामील झालेल्या नागरिकांच्या हातात संविधान, धर्मनिरपेक्षतेचे संदेश देणारे फलक दिसत होते. धार्मिक सौहार्द, एकात्मता आणि सामाजिक समतेचा नारा देत ही यात्रा पुढे सरकत होती. या पदयात्रेबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली.
धर्माच्या नावावर फूट
जो व्यक्ती या देशावर प्रेम करतो, तो कोणत्याही जाती-धर्माचा भेद न करता सर्वांना बरोबर घेऊन चालतो. तोच माणूस काँग्रेसच्या विचारांशी जोडलेला असतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. दोन माणसे, जाती आणि धर्म जोडण्याचे काम करणाऱ्यांना ही सद्भावना यात्रा प्रेरणा देणारी आहे, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी असंही म्हटलं की, धर्माच्या नावावर देशात फूट पाडण्याचं काम सुरू आहे. विकासाचं राजकारण बाजूला राहिलं असून, समाजात विष पेरण्याचं काम केलं जात आहे.
अशा घडामोडींना काँग्रेसकडून ही सद्भावना यात्रा म्हणजे स्पष्ट उत्तर आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काँग्रेसला लक्ष्य करत, काँग्रेस फोडा, काँग्रेस रिकामी करा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. त्यावर वडेट्टीवार यांनी परखड प्रत्युत्तर दिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. ही सत्तेची मस्ती आहे, असा घणाघात त्यांनी केला.
Prakash Ambedkar : गौतम बुद्धांच्या रत्नांवरून आंबेडकरांचा संताप
देशाला एकतेची गरज
वडेट्टीवार यांनी भाजपवर आरोप करताना म्हटलं, दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवण्याची हीच यांची परंपरा आहे. सतत फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांच्या तोंडातून असेच शब्द येणार, यात नवल नाही. सद्भावना यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने हम सब एक हैं’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. आम्ही भारतमातेचे पुत्र आहोत. आम्ही विषमता, धर्मांधता आणि जातीयतेला कधीही साथ देणार नाही, असं म्हणत वडेट्टीवारांनी देशाला एकात्मतेच्या मार्गाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
