
राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा खेळखंडोबा झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. गृहराज्यमंत्र्याचाच मोबाईल पोलिसांसमोर चोरीला गेल्याने सरकारची पकड कुठेच उरली नसल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचं अक्षरशः बारा वाजलेत की काय, असा प्रश्न सध्या जनतेपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांच्याच मनात घर करून बसला आहे. कारण खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क पोलिसांच्या साक्षीने चोरीला गेला आहे. हो, ऐकून धक्का बसतोय ना? पण हे खरं आहे. अशा प्रकारावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जबरदस्त टोले लगावले आहेत. त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर हल्लाबोल करत म्हटलं की, “पोलीस समोर जर गृहराज्यमंत्र्यांचाच खिसा कापला जात असेल, तर मग साध्या माणसाचं काय? गुन्हेगार आता म्हणतायत की, ‘तुम पोलीस हो तो हम तुम्हारे बाप है.
एकेकाळी मंत्रालयाच्या पायऱ्यांवर सेल्फी काढणारे गुंड, आता थेट गृहराज्यमंत्रीचाच फोन उडवतायत. ही प्रगती बघून कुणाच्याही भुवया उंचावतील. बीडसारख्या जिल्ह्याला आधीच गुन्हेगारीमुळे वाईट प्रसिद्धी आहे, आणि आता तर ‘मोबाईल चोरी’ या प्रकाराने तर इतिहासच रचला. चोरट्याने थेट गृहराज्यमंत्र्यांच्या खिशाला हात घातला, तेही पोलिसांच्या डोळ्यासमोर, ही लाजिरवाणी बाब आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

पोलीस-चोर भाई-भाई ?
वडेट्टीवार यांनी थेट पोलिसांनाही लक्ष्य करत विचारलं की, या प्रकरणात पोलीस आणि चोरांची हातमिळवणी तर नाही ना? या प्रश्नावर अनेकांचे डोळे खरेच विस्फारले. कारण गृहराज्यमंत्र्याचाच मोबाईल चोरीला गेला, तर बाकी जनतेचं काय होणार? वडेट्टीवार पुढे म्हणतात, आज कायदा, पोलीस आणि मंत्री या सगळ्यांचा धाक केवळ कागदावर राहिलाय. गुन्हेगारांना आता काही भीतीच राहिलेली नाही. खरंच, जर मंत्रीच असुरक्षित असतील, तर सामान्य नागरिकांचा कायदा-सुव्यवस्थेवर विश्वास राहिलाय का? असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
योगेश कदम यांचा मोबाईल हरवला नाही, तर सरकारचा ‘नेटवर्क’ हरवलाय, असं म्हणायला हरकत नाही. विरोधकांनी या प्रकरणावरून जोरदार राजकीय हल्ला चढवला आहे आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. सध्याच्या परिस्थितीत, गृहमंत्री स्वतःचा मोबाईल वाचवू शकत नसतील, तर जनतेच्या सुरक्षेची ‘रिंगटोन’ही कुणी ऐकणार नाही, असा टोलाही विरोधकांनी लगावला आहे.