
माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या शतकोत्तर जयंती रौप्य कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भाजपचे आमदार किशोर चोरगेवार यांच्यामार्फत माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह सर्वच महत्वाच्या राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांबाबत केलेल्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठं वक्तव्य केलं. वडेट्टीवार म्हणाले की, त्याकाळी कर्मवीर मारोतराव कन्नमवार यांच्याकडे आम्ही यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हणून बघायचो. मारोतराव कन्नमवार कालांतरानं मुख्यमंत्री देखील झालेत. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडं कतृत्व आहे. कार्यक्षेत्रात काम करण्याची क्षमता आणि हिमंत आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील नरेंद्र मोदीं यांचं राजकीय वारसदार होणं स्वभाविक आहे. त्यात काहीही वावगं नाही. वडेट्टीवार यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

आमदार Kishor Jorgewar यांना टोला
विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांना टोला लगावला. वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी जो प्रस्ताव किशोर जोरगेवार यांनी मांडला, त्याला आपण अनुमोदन देतो. खरे म्हणजे बाजुची खुर्ची घेण्यात तुम्ही अतिशय पटाईत आहात. राजकारणात हे कौशल्य आहे. काही गोष्टी सिनीअरला सुद्धा ज्युनिअरकडून शिकाव्या लागतात. कन्नमवार यांच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात आपण आल्यापासून किशोर जोरगेवारांकडून शिकलो, असा खोचक टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला.
कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा वाघ आणि वारांचा जिल्हा असल्याचं ठाऊक आहे, असं नमूद केलं. आमदार सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, विजय वडेट्टीवार ही नावं त्यांनी यावेळी घेतली. सगळे वार आमचे मित्र आहेत. त्यामुळे कोणतेही कुठलेही वार असले तरी आम्ही त्यांचा सन्मान करतो. आम्ही हेडगेवारांचे अनुयायी आहोत. त्यामुळे वार हे आडनाव आले की, आमचे हात नेहमी पुढे असतात, असे फडणवीस म्हणाले. मारोतराव कन्नमवार व्रतस्थ नेता होते. त्यांचे कार्य नव्या पिढीला हे माहीत झाले पाहिजे. आरोग्य सेवा साठी दादासाहेब कन्नमवार यांचे काम मोठे होते. शिक्षणाच्या क्षेत्रात अनेकांना प्रेरित केले. दादासाहेबांचे चरित्र प्रेरणादायी असल्याचंही फडणीस म्हणाले. त्यांच्या या कार्यामुळंच त्यांना कर्मवीर अशी पदवी मिळाल्याचं फडणवीस म्हणाले.