महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : शासनग्रंथ हा धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ

Maharashtra : संविधान आणि संतपरंपरेच्या रक्षणासाठी वडेट्टीवार मैदानात

Author

विधिमंडळात भारतीय संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा करतांना संविधान लोकशाहीच्या रक्षणासाठी विजय वडेट्टीवार आक्रमक झाले.

महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या कडाक्याने जसे तापमान वाढले आहे, तसेच राज्याचे राजकारणही तापले आहे. भारतीय लोकशाहीची ताकद तिच्या संविधानात आहे. संविधान हा फक्त कायद्यांचा संच नाही, तर तो भारतीय समाजाच्या आत्म्याचा आरसा आहे. असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात केले. 25 मार्च रोजी विधानसभेत भारतीय संविधानाच्या गौरवशाली वाटचालीवर चर्चा झाली. तेव्हा वडेट्टीवार यांनी ठामपणे भूमिका मांडली. त्यांनी संविधान हे कोणत्याही धर्मग्रंथांपेक्षा श्रेष्ठ असल्याचे स्पष्ट करत, त्याच्या पायमल्लीला कोणत्याही परिस्थितीत विरोध केला जाईल, असा कडक इशारा दिला.

भारतीय लोकशाही भक्कम आहे, पण सध्याच्या द्वेषपूर्ण वातावरणात संविधान धोक्यात आहे. संविधानाला हात घालण्याचा प्रयत्न कुणीही केला, तर त्यांची सत्ता टिकणार नाही, असे त्यांनी ठाम शब्दांत सांगितले. वडेट्टीवार यांनी संविधानाच्या गौरवशाली प्रवासावर प्रकाश टाकत, त्याच्या रचनेत महात्मा गांधींच्या भूमिकेचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.

Maharashtra : शिवकाळाचा वारसा राज्याच्या स्वाधीन होणार

संतांची शिकवण 

भारतीय संविधानाचे मूळ तत्वज्ञान संतांच्या शिकवणुकीतून आले आहे. असे सांगताना वडेट्टीवार यांनी संत तुकाराम, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांचा उल्लेख केला. त्यांनी सामाजिक समता, आत्मोन्नती, आणि विवेकवाद यांचा पुरस्कार केला. संविधानाच्या कलम 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटन स्वातंत्र्य, आणि विचारस्वातंत्र्य यांना जो महत्त्व आहे, तो याच संत परंपरेतून आलेला आहे.

संत जनाबाई आणि संत बहिणाबाई यांनी महिलांच्या सन्मानासाठी लढा दिला आणि त्याच मूल्यांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात आढळते. पुरोगामी विचारसरणीने तयार झालेले संविधान, आजही लोकशाहीचे भक्कम रक्षण करत आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

महाराष्ट्रात संविधानाची पायमल्ली

वडेट्टीवार यांनी राज्यात संविधानाच्या उल्लंघनाची अनेक उदाहरणे दिली. राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या एका राज्यपालाने महापुरुषांबद्दल अपशब्द काढले. दोन पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्यात आली आणि तीन वर्षे झाली तरी न्यायालयाचा निर्णय आलेला नाही. हे संविधानाच्या तत्वांना छेद देणारे आहे, असा आरोप त्यांनी केला.

राज्यातील महापालिकांमध्ये लोकनियुक्त प्रशासन नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘आज महाराष्ट्रात कोणत्याही महापालिकेत लोकप्रतिनिधी नाहीत, निवडणुका होत नाहीत, ही संविधानाची पायमल्ली नाही का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

औरंगजेबाची कबर

छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूविरुद्ध पराक्रम गाजवला, पण त्याचवेळी शत्रूच्या निष्पाप स्त्रियांवर हात न उचलण्याची शिकवण दिली. ‘आज काही जण औरंगजेबाच्या कबरीचा विषय उकरून इतिहास बदलायचा प्रयत्न करत आहेत. पण जी कबर मराठी बाण्याचे प्रतीक आहे, ती उद्ध्वस्त करून तुम्ही शिवरायांच्या पराक्रमाची कहाणी पुसू शकता का?’ असा परखड सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!