
पश्चिम नागपूरमध्ये आमदार विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने झोपडपट्टी वासीयांना हक्काचे पट्टे देण्यासाठी महसूल विभाग, मनपा व नासुप्रकडून प्रक्रिया सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत आहे. प्रत्येक पक्ष आपल्या ताकदीत भर टाकण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, पश्चिम नागपूरमध्ये सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या योजनांची अमलबजावणी करण्याची तयारी जोरात सुरू आहे. काँग्रेस पश्चिम नागपूरचे आमदार तथा नागपूर शहर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या भागातील रहिवाशांच्या हक्कांसाठी विशेष प्रयत्न करत असून, त्यांच्या पुढाकारामुळे झोपडपट्ट्यांतील पट्टे वाटप प्रक्रियेला गती मिळाली आहे.
नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत, ठाकरे यांनी पश्चिम नागपूरमधील ८४ झोपडपट्ट्यांमधील पट्टे वाटपाच्या प्रगतीचा तपशील घेतला. यावेळी महसूल विभाग, मनपा आणि नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) यांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. त्यानुसार, या झोपडपट्ट्यांतील ११ ठिकाणी पट्टे आधीच वितरित झालेले आहेत. तर उर्वरित ७३ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून ‘प्लेन टेबल सर्व्हे’देखील पूर्ण करण्यात आला आहे. आमदार विकास ठाकरे म्हणतात की, लवकरच पात्र झोपडपट्ट्यांच्या रहिवाशांना महसूल विभाग, मनपा व नासुप्रच्या मालकीच्या जमिनीवर पट्टे देण्यात येतील.

Rajendra Mulak : जुनं प्रेम पुन्हा फुललं, राजकारणातही हृदय जुळलं
गरजूंना घरांची हमी
याकरिता संबंधित विभागांमध्ये नियमित संवाद सुरू आहे. हक्काच्या पट्ट्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.शिवाय, मानकापूर भागातील राजनगर आणि संत सोसायटीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी एसआरए (स्लम पुनर्विकास प्रकल्प) आणि पीएमएवाय (प्रधानमंत्री आवास योजना) योजनेतून योजना राबवण्याचा देखील प्रस्ताव तयार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आणि नासुप्रला या योजनेत आवश्यक जागा शोधण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून गरजू नागरिकांना घर उपलब्ध करून देण्यात यावे. झुडपी जंगलातील झोपडपट्ट्यांची स्वतंत्र यादी राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे.
पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार आहे. या सर्व उपक्रमांमुळे पश्चिम नागपूरच्या हजारो झोपडपट्टीवासीयांना त्यांच्या घरांवर अधिकृत हक्क मिळण्याची आशा वाढली आहे. अंबाझरी आणि पांढराबोडी येथील झोपडपट्ट्यांमध्ये नव्याने सुरू झालेल्या सर्वेक्षणामुळेही या भागातील रहिवाशांना मोठा फायदा होणार आहे.या प्रयत्नांमुळे पश्चिम नागपूरमध्ये सामाजिक न्यायाच्या दिशेने मोठा टप्पा गाठला जाणार असल्याची अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या योजनांचा राजकीय आणि सामाजिक दृष्टीनेही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
विकास ठाकरे यांच्या पुढाकाराने या भागातील अनेक गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यात मोठी मदत होणार आहे. जेथे घरांचा हक्क व सुरक्षित निवास यासाठी अनेक वर्षे संघर्ष सुरू होता. आता या समस्या दूर करून नागपूरमधील गरजू लोकांच्या जीवनात सुधारणा होईल, अशी आशा वर्तवली जात आहे.