महाराष्ट्र

Vinod Agrawal : बनावट खत विक्रेत्यांना उघडं पाडा

Gondia : शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विनोद अग्रवाल आक्रमक

Author

आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठक गोंदियात पार पडली. शेतकऱ्यांना योग्य योजना आणि खात्रीशीर बियाणे-खते मिळावीत यासाठी विविध निर्देश दिले गेले.

गोंदिया तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. मंगळवारी दुपारी पंचायत समिती गोंदिया येथे आमदार विनोद अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली खरीपपूर्व नियोजन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना बियाणे-खते पुरवठा आणि बनावट खत-बियाण्यांविरोधात कडक कारवाई यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीला जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या अध्यक्षा दीपा चंद्रिकापुरे, पंचायत समितीचे अध्यक्ष मुनेश रहांगडाले, उपाध्यक्ष शिवलाल जामरे, माजी उपाध्यक्ष नीरज उपवंशी, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पांढरे व आनंदा वाढवे, तसेच कृषी उपसंचालक महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव, कृषी विज्ञान केंद्राचे वैज्ञानिक विशाल उबरहंडे यांच्यासह सर्व विभागीय अधिकारी उपस्थित होते.

Sunil Mendhe : जातनिहाय जनगणना समाजातील परिवर्तन घडवणारी ठरेल  

शेतकऱ्यांचे संरक्षण

आमदार विनोद अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बनावट खते आणि बियाणे विकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. गावोगावी तीन ते चार प्रगतशील शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषी सहाय्यकांनी नियमित गावभेटी कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर आंबा, सीताफळ, सपोटा, पेरू आणि तेलबिया या फळबागांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यावरही त्यांनी भर दिला.

विनाशकारी नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देशही आमदार अग्रवाल यांनी दिले. विमा कंपन्यांचे प्रतिनिधी गावात येतील याची माहिती लोकप्रतिनिधींना दिली जावी. शेतकऱ्यांना वेळेत बियाणे-खते मिळतील याची खात्री कृषी विभागाने करावी, असे ते म्हणाले.

Political War : जनगणनेचा निर्णय परखड, पण ‘श्रेय’वादाचा कागद जड 

योजनांचा लाभ गावपातळीवर

महेंद्र ठोकळे यांनी जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती सादर केली. तालुका कृषी अधिकारी नेहा आढाव यांनी खरीप हंगाम नियोजनाचे सविस्तर सादरीकरण केले. पोखरा योजनेसंदर्भात विभागीय कृषी अधिकारी रामटेके यांनी आमदारांना माहिती दिली.

बैठकीचे संचालन कृषी पर्यवेक्षक टी.एस. तुरकर यांनी केले. आत्माराम पाचे, हुसनलाल ठाकरे, कमलेश ठाकरे, भूपेंद्र हरिणखेडे या प्रगतशील शेतकऱ्यांसह तालुक्यातील सर्व कृषी अधिकारी व सहाय्यक सहभागी झाले. एकात्मिक प्रयत्नांद्वारे गोंदिया तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक, पारदर्शक आणि फसवणुकीपासून मुक्त कृषी सेवा देण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरली.

Farmer Loan Waiver : पश्चिम विदर्भात गडगडला उद्धव ठाकरे गटाचा ट्रॅक्टर

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!