
नागपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईसाठी डॉ. विपीन इटनकर यांनी तालुकास्तरावर समित्या बळकट करण्याचे आदेश दिले. या समित्यांमार्फत गावपातळीवर तात्काळ तपासणी आणि कठोर कारवाई केली जाणार आहे.
बोगस डॉक्टरांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या नेतृत्वाखाली एक व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर आता तालुकास्तरावरही समित्यांचे जाळे अधिक परिणामकारक केले जाणार आहे.

बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाई ही केवळ पोलिसी नव्हे, तर आरोग्य सुरक्षा मोहिम मानून जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यवाहीस एक वेगळी दिशा दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी ठोस निर्देश दिले आहेत. ही संपूर्ण मोहिम ऑपरेशन क्लिनअपच्या धर्तीवर राबविण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Chandrashekhar Bawankule : समस्या जिथे, निराकरण तिथल्या तिथेच
नव्या जबाबदाऱ्या
तालुका स्तरावरील समिती तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली अधिक सदस्यसंख्येसह कार्यरत राहणार आहेत. यामुळे पडताळणी व कारवाई अधिक प्रभावी आणि गतीमान होणार आहे. या समित्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पथक व अन्न-औषध प्रशासनाचे प्रतिनिधी अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
तालुका स्तरावरील समितींवर ठोस जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. कोणतीही कारवाई पोकळ ठरणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. बोगस डॉक्टरांकडून ग्रामीण भागात होणारी फसवणूक रोखण्यासाठी ग्रामस्तरावरही जनजागृती मोहिम राबविण्यात येणार आहे.
Vijay Wadettiwar : पहलगाम हल्ल्यावरील माझ्या विधानाचा खेळखंडोबा केलाय
संवाद सेतू
बोगस डॉक्टरांविरुद्ध कारवाईस सामान्य नागरिकांना सहभागी करता यावे, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मोबाईल ॲप व संवाद सेतू क्रमांकाद्वारे नागरिक तक्रार करू शकतील. ती तक्रार कुणीही नष्ट करू शकणार नाही, अशी शिस्तबद्ध यंत्रणा उभी केली जात आहे.
माध्यम केवळ तक्रारीसाठीच नाही, तर प्रशासन आणि नागरिकांमधील दुवा म्हणूनही काम करणार आहे. बोगस डॉक्टरांविरुद्ध मिळालेल्या तक्रारीची तत्काळ चौकशी करून धाड टाकण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत राहणार आहे. संपूर्ण मोहिमेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.
आयुक्तीय पातळीवरून पाऊल
ग्रामीण भागातील आरोग्य सेवा पारदर्शक व विश्वासार्ह ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला मध्यवर्ती भूमिका देण्यात आली आहे. याशिवाय महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून देखील समितींची रचना करण्यात येत आहे. ज्यामुळे नागपूर शहरातही बोगस डॉक्टरांवर करडी नजर ठेवली जाणार आहे.
बैठकीस अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असिम इनामदार, तसेच मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक सेलोकर व डॉ. प्रशांत कापसे उपस्थित होते. सर्व संबंधित विभागांनी एकसंघपणे ही कारवाई प्रभावीपणे राबवावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.