राज्यात लवकरच देवीच्या भक्तीचा सण म्हणजे नवरात्री उत्सव साजरा होणार आहे. अशातच उपराजधानी नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेकडून वादग्रस्त वक्तव्य केलं गेलं आहे.
नागपूर, ही महाराष्ट्राची उपराजधानी, गेल्या काही महिन्यांत एका अभूतपूर्व संकटातून गेली आहे. शहराने 300 वर्षांच्या इतिहासात कधीही न अनुभवलेल्या जातीय दंगलींचा सामना केला. दोन धर्मांमधील वाद औरंगजेबाच्या मुद्द्यावरून उफाळून आला. ज्यामुळे पहिल्यांदाच नागपूरच्या रस्त्यांवर हिंसाचाराचे ढग दाटले. ज्यामुळे सर्वत्र तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता शहरात शांतता नांदू लागली आहे. लोकांच्या मनातून भीती हळूहळू दूर होत आहे. दैनंदिन जीवन पूर्वपदावर आले आहे. पण हे शांततेचे वातावरण किती काळ टिकेल? हा प्रश्न आता प्रत्येक नागपूरकराच्या मनात घर करून बसला आहे. याचे कारण आहे विश्व हिंदू परिषद (विहिप) आणि बजरंग दलाच्या नव्या भूमिकेमुळे निर्माण होत असलेला वाद. राज्यात सध्या भक्तीचे उत्सव जोरात सुरू आहेत.
गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची तयारी जोरात आहे. देवीची पूजा, आरती, आणि गरबा नृत्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आहे. गरबा हा उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव. ज्यात लोक एकत्र येऊन देवीला प्रसन्न करण्यासाठी नाचतात. मात्र, हाच गरबा आता वादाच्या केंद्रबिंदू बनला आहे. विहिंपने थेट घोषणा केली आहे की, नवरात्रोत्सवातील गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे. मुस्लिम किंवा इतर धर्मीयांना त्यात प्रवेश देऊ नये, अशी त्यांची कठोर भूमिका आहे. यामुळे शहरात पुन्हा एकदा तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूरमध्ये विहिंपची पत्रकार परिषद होणार आहे, ज्यात ही भूमिका स्पष्टपणे मांडली जाईल. विहिंपच्या म्हणण्यानुसार, गरब्यात प्रवेश करताना आधार कार्ड तपासावे. येणाऱ्या व्यक्तीला टिळा लावावा आणि देवीची पूजा करण्यास सांगावे. या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी बजरंग दल आणि विहिपचे कार्यकर्ते गरबा स्थळांवर लक्ष ठेवून राहणार आहेत.
Ravikant Tupkar : मंत्र्यांना तुडवून शेतकऱ्यांसाठी न्याय मिळवू
आयोजन समितीचा अधिकार
गरबा हे नृत्य नव्हे तर देवीची आराधना आहे. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना प्रवेश देऊ नये. या भूमिकेमुळे गरबा आयोजकांना निवेदन देण्यात आले आहे, ज्यात या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन आहे. या वादामुळे शहरातील सामाजिक सौहार्दावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. एकीकडे भक्तीचा उत्सव साजरा होत असताना, दुसरीकडे अशा प्रतिबंधामुळे धार्मिक भेदभाव वाढण्याची शक्यता आहे. नागपूरकरांना आठवते की, अशा छोट्या ठिणग्यांमुळेच पूर्वी दंगली भडकल्या होत्या. आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. मात्र, विहिपच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू आहे. काहींनी याला धार्मिक स्वातंत्र्याचा मुद्दा म्हणून पाठिंबा दिला आहे, तर काहींनी याला विभाजनकारी म्हणून टीका केली आहे.
संपूर्ण प्रकरणावर राज्याचे महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, गरबा आयोजन समितीला अटी-शर्ती ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र, कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी असणे आवश्यक आहे. या परवानगीवरच आयोजकांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. बावनकुळे यांच्या या प्रतिक्रियेमुळे राजकीय चर्चाही सुरू झाली आहे. ते म्हणतात की, धार्मिक उत्सवात सुरक्षितता आणि शांतता राखणे हे प्राधान्य आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भूमिका घेणे हे विहिंपसाठी दरवर्षीचे आहे. दरवर्षी नवरात्र सुरू होण्यापूर्वी अशी पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका मांडतात. मात्र, यावर्षी नागपूरच्या पार्श्वभूमीवर याला विशेष महत्त्व आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, गरबा हा सर्वांसाठी खुला उत्सव असावा, ज्यात विविध धर्मीय एकत्र येऊन आनंद साजरा करू शकतात. पण विहिपच्या म्हणण्यानुसार, हे धार्मिक आराधना असल्याने ते केवळ श्रद्धावानांसाठी मर्यादित असावे.