नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेल्या वादाला विश्व हिंदू परिषदेने आता सौम्य वळण दिलं आहे. राजकीय वापर नको, हा मुद्दा भाविकांच्या श्रद्धेचा आहे, अशी भूमिका विहिंपने स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून पेटलेल्या वादात आता निर्णायक वळण आले आहे. एकेकाळी या कबरीच्या विरोधात आंदोलने करणारी विश्व हिंदू परिषद आता संयमित आणि संतुलित भूमिका मांडत आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकीय कुरघोडीसाठी वापरू नका, असा सल्ला देत विहिंपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक चौगुले यांनी संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे. नागपुरात नुकत्याच पार पडलेल्या ‘हिंदू पुनरुत्थानाचे शिल्पकार मोरोपंत पिंगळे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट मत मांडले.
औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात या आधी तीव्र आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेने राज्यभरात निषेध मोर्चे, सभासद अभियान आणि विविध प्रकारची आंदोलने केली होती. नागपूरमध्ये यावरून तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं. खुद्द राज्याचे मंत्री नितेश राणे यांनीही याबाबत आक्रमक वक्तव्ये केली होती. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव झाल्यानंतर आता विश्व हिंदू परिषद शांततेचा संदेश देत असून धार्मिक संवेदना जपण्यावर भर देत आहे.
राजकीय हस्तक्षेप टाळावा
विहिंपचे उपाध्यक्ष अशोक चौगुले यांनी केवळ औरंगजेबाच्या कबरीबाबतच नव्हे, तर मंदिर व्यवस्थापनाच्या संदर्भातही महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, मंदिर व्यवस्थापन समित्यांमध्ये कोण राहावे, यामध्ये राजकीय व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये. जर कोणी राजकीय व्यक्ती समितीमध्ये असेलच, तर त्याने हिंदू धर्मातील परंपरा पाळणे आणि निष्ठावान भाविक असणे आवश्यक आहे. यामुळे मंदिर व्यवस्थापन अधिक पारदर्शक, भक्ताभिमुख आणि धार्मिक मूल्याधिष्ठित होईल. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मंदिरांच्या जमिनीवर झालेल्या कथित अतिक्रमणाचा मुद्दा देखील विश्व हिंदू परिषदेने उपस्थित केला आहे. या मुद्द्यावरही त्यांनी भावनिक आणि धर्मनिष्ठ भूमिकेचा पुनरुच्चार करत भाविकांनीच मंदिरांचे व्यवस्थापन ठरवावे, असे प्रतिपादन केले.
छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला सामाजिक आणि धार्मिक तणाव लक्षात घेता, चौगुले यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, ती जागा खासगी आहे. तिचा सार्वजनिक गौरव होऊ नये. तिला अनावश्यक प्रसिद्धी देणे किंवा तिचा राजकीय वापर करणे टाळावे. अशा गोष्टींमुळे समाजात तेढ निर्माण होते. जी कोणाच्याच हिताची नाही. यापुढे यावर राजकारण होऊ नये, हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे. याआधी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनांमुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राज्यभर गाजला होता. मात्र, आता त्याच संस्थेने भूमिका सौम्य करून ‘राजकारण नको’ म्हणणे, हेच दाखवते की धार्मिक संस्था आता शांततेच्या मार्गावर चालण्यास तयार आहेत. राजकीय ताणतणावाऐवजी धार्मिक एकतेचा आधार घेऊन समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो.
Vijay Wadettiwar : अळ्या मुलांच्या आहारात, वडेट्टीवारांचे फटके सभागृहात
ऑस्ट्रेलियात संमेलनाची घोषणा
या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घोषणा देखील चौगुले यांनी यावेळी केली. 1 आणि 2 ऑगस्ट 2025 रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्व हिंदू संमेलनात जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संमेलनात हिंदू धर्माच्या जागतिक एकतेचा, परंपरांचा आणि सुसंवादाचा विचार मांडला जाणार आहे. जगभरात हिंदू विचारसरणीच्या आधारावर शांततेचा, विकासाचा आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचवण्याचा विहिंपचा हा प्रयत्न मानवीतेच्या हिताचा आहे. भारतात निर्माण होणाऱ्या धार्मिक वादातून सुटका मिळवण्यासाठी अशा स्पष्टवक्तेपणाची गरज होती. विश्व हिंदू परिषद सध्या त्याच दिशेने पावले टाकत असल्याचे दिसते.