
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं पुणे सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड शरण आला आहे. पुण्यात सीआयडीसमोर त्यानं शरणागती पत्करली. वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या हत्याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन आरोपी फरार आहेत. त्यापैकी कराड हा शरण आला आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून करण्यात आला होता.
आरोपींना अटक झाली नाही म्हणून गावकऱ्यांनी आणि देशमुख परिवारानं आंदोलन केलं. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजला होता. बीडच्या खासदारांनी दिल्लीमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनावेळी हा मुद्दा मांडला. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या हत्येचा तपास सीआयडीकडं सोपविण्यात आला होता. आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा नीकटवर्तीय आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती.

दोषी असेल तर फाशी
वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात जे दोषी असतील त्यांना फाशी द्या, असं यावर धनंजय मुंडे म्हणाले होते. त्याप्रकरणातील काहींच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली. पोलिसांपुढं शरण आल्यानंतर खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली, असं कराडनं नमूद केलं. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी, असंही कराड म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमात भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या गुन्हेगारीबाबत आवाज उठवला आहे. वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनीही पूर्वी केली होती.
कराडच्या आत्मसमर्पणानंतर अनेकांनी पोलिस आणि सरकारवर रोष व्यक्त केला आहे. हा प्रकार पोलिसांच्या नाकर्तेपणा अधोरेखित करणार आहे. या हत्येनंतर लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. कराड शरण येणार आहेत याचे मेसेज सर्वत्र व्हायरल झाले. याचा अर्थ पोलीस सोडून सर्वांना सगळं काही माहिती होतं, असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या. देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनीही यावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या. माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. गुन्हेगार स्वत: पोलिसांपुढं येत आहेत. त्यामुळं पोलिस काय करत आहेत, असा प्रश्न निर्माण होतो. प्लॅनिंग करून कराडला शरण आणण्यात आलं आहे. कराड पुण्यात होता, असा दावा अंजली दमानिया यांनी यावेळी केला.