महाराष्ट्र

Eknath Shinde : सोयीचं राजकारण आम्ही करत नाही

Shiv Sena : वक्फ विधेयकावरून महाराष्ट्रात राजकीय महाभारत

Author

वक्फ बिलाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला ठाम भूमिका घ्यावी असा सल्ला देत त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला आहे.

सध्या राजकीय रणधुमाळीत वक्फ दुरुस्ती विधेयक हा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. सरकारने हे विधेयक पारित करण्याचा विचार मांडला असताना, विपक्षाने त्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. राज्यभरातून या विधेयकावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असतानाच, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात या मुद्द्यावरून जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधत त्यांना एका ठाम भूमिकेवर राहण्याचा सल्ला दिला आहे.

वक्फ विधेयकासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शिंदे शिवसेनेची भूमिका नेहमीच ठाम आणि स्पष्ट राहिली आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचे पालन करतो. सत्तेसाठी किंवा स्वार्थासाठी आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही. त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधत त्यांची भूमिकाच संशयास्पद असल्याचे म्हटले. ते एकीकडे हिंदुत्वाचा दावा करतात, तर दुसरीकडे संधी मिळताच सोयीस्कर राजकारण करतात, अशी बोचरी टीका शिंदे यांनी केली. शिवसेनेची खरी विचारधारा काय आहे, हे उघड करावे लागेल, असे ते म्हणाले.

फक्त फायद्याचे समर्थन

शिंदे यांनी सांगितले की, आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही कोणत्याही परिस्थितीत सोयीचे राजकारण करत नाही. आम्ही जसे आहोत तसेच राहू. शिंदे यांनी स्पष्ट केले की, वक्फ बोर्डाची संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात असण्यापेक्षा मुस्लिम समाजातील सर्वसामान्यांना त्याचा फायदा मिळावा, यासाठी हे विधेयक महत्त्वाचे आहे. सध्या त्या संपत्तीवर कोणाचा खरा ताबा आहे याचा विचार करायला हवा. त्यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिले की, एकाच भूमिकेवर ठाम रहा.

ठाकरेंना जेव्हा फायदा दिसतो तेव्हा समर्थन करायचे आणि तोटा दिसला की भूमिका बदलायची हीच दुटप्पी वृत्ती ठाकरे गटाला खाली घेऊन जाईल. शिंदे यांनी विधानसभेच्या निकालांचे दाखले देत सांगितले की, ठाकरे गटाने 100 जागा लढवल्या आणि केवळ 20 जागा जिंकल्या. भविष्यात महापालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल. त्यांनी ठाकरे गटाला टोला मारत विचारले की, ते बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत की राहुल गांधींच्या निर्देशांनुसार काम करत आहेत.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!
Close