वाशिम जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे .प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरल्याने काही गावांमध्ये विहिरी कोरड्या पडल्या व टँकर पुरवठाही अपुरा ठरत आहे.
वाशिम जिल्ह्यात यंदा कमी झालेल्या पावसामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घसरली आहे. परिणामी, जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, कारंजा आणि मानोरा या सहा तालुक्यांमध्ये गंभीर स्वरूपाची पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या भूजल सर्वेक्षणानुसार ७९ विहिरींच्या निरीक्षणातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाण्याची पातळी इतकी घसरली आहे की अनेक ठिकाणी शेकडो फूट खोल बोअरवेल मारूनही पाणी लागत नाही.
गेल्या काही वर्षांपासून सततच्या पाणीटंचाईच्या समस्येकडे प्रशासनाकडून योग्य लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. उन्हाळ्याच्या प्रारंभालाच ही परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून, एप्रिल-मे महिन्यात हा प्रश्न आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निष्क्रीयतेमुळे नागरिक हैराण
वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करत असलेल्या गावकऱ्यांना अद्याप ठोस उपाययोजना मिळालेल्या नाहीत. शासनाच्या जलसंधारण योजना केवळ कागदावरच रेंगाळल्या आहेत, आणि प्रत्यक्षात त्याचा लाभ नागरिकांना मिळताना दिसत नाही. मागील वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यावर कुठलाही ठोस उपाय न झाल्याने यंदा परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च करून जलयुक्त शिवार यांसारख्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ किती मिळाला, याचा आढावा घेतला असता धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. जलसंधारणाच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या असतानाही प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केल्याने आज जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.
तालुक्यांची परिस्थिती भयावह
संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असला तरी मानोरा आणि कारंजा तालुक्यातील परिस्थिती अधिकच भीषण आहे. येथे काही गावांमध्ये विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अंतरावर जावे लागत आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे, मात्र टँकर पुरवठाही अपुरा ठरत आहे.अनेक गावांमध्ये महिलांना पाण्यासाठी दीड-दोन किलोमीटर अंतर पायपीट करावी लागत आहे. काही गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी भांडणे होत आहेत. शासनाने योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या, तर ही परिस्थिती ओढवली नसती, असे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
पाण्यासाठी संघर्षाची शक्यता
गेल्या काही वर्षांमध्ये वाशिम जिल्ह्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणावर घसरत चालली आहे. जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन न केल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील काही आठवड्यांत पाण्यासाठी लोकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. शासनाने तातडीने पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर लोक आक्रमक होतील, अशी भावना जिल्ह्यात व्यक्त केली जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून, याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.