महाराष्ट्र

Maharashtra : वाशिम जिल्ह्याचा राज्यभरात डंका

Vidarbha : आरोग्य सेवा क्रमवारीत अव्वल स्थान

Author

महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वाशीम जिल्ह्याने संपूर्ण राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. आरोग्य विभागाच्या विशेष तपासणीत वाशीम जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात आपली छाप उमटवली.

महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये वाशीम जिल्ह्याने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. आरोग्य विभागाच्या विशेष पथकाने जानेवारी 2025 मध्ये केलेल्या तपासणीत वाशीम जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांनी उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान मिळवले. मात्र, विदर्भातील इतर जिल्ह्यांना या यादीत स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांना कार्यप्रणालीत सुधारणा करण्याच्या स्पष्ट सूचना आरोग्य सेवा संचालकांनी दिल्या आहेत.

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृ आरोग्य, बालकांचे आरोग्य, कुटुंब नियोजन, साथरोग नियंत्रण, गंभीर रुग्णांसाठीच्या सुविधा आणि इतर एकूण 30 निर्देशांकांवर राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे मूल्यमापन करण्यात आले. सरकारी रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मातांना व नवजात बालकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवांचे, लसीकरणाचे, उच्च रक्तदाब व मधुमेह नियंत्रण उपाययोजनांचे तसेच हृदयरोग रुग्णांना दिल्या जाणाऱ्या उपचारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तपेढ्या, सोनोग्राफी, सी.टी. स्कॅन, डायलिसिस सुविधा, कुपोषित बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र (NRC), प्रसूती व नवजात शिशू काळजी केंद्रे आणि अतिदक्षता विभाग (ICU) यांसारख्या सेवांची गुणवत्ता तपासण्यात आली.

Parinay Fuke : आरोपांच्या पिचकारीनं नेते अन् खंडणीखोर एजन्ट्सची होळी

वाशीमचा विक्रम 

तपासणी दरम्यान वाशीम जिल्ह्याने उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविल्याचे प्रमाणित झाले. वाशीम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे यांनी सलग पाचव्यांदा संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांनी दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला. यामुळे दोन्ही प्रमुख पदांवर वाशीम जिल्ह्याने राज्यभरात अव्वल कामगिरी करत एक अनोखा विक्रम प्रस्थापित केला

वाशीम वगळता विदर्भातील कोणत्याही जिल्ह्याने पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळवले नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या गटात चंद्रपूर सहाव्या, गडचिरोली सातव्या, अकोला दहाव्या स्थानी आहे. तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या यादीत वर्धा सहाव्या,bयवतमाळ आठव्या स्थानावर आहे. यावरून स्पष्ट होते की, विदर्भातील इतर जिल्ह्यांना आरोग्य व्यवस्थेच्या सुधारणा करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.

सर्वात कमकुवत जिल्हे

तपासणीत सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांचीही नोंद करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या गटात बुलढाणा, पुणे, ठाणे, कोल्हापूर, जालना हे पाच जिल्हे तळात राहिले. तर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या यादीत गडचिरोली, भंडारा, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड यांची सर्वात खालची कामगिरी नोंदवली गेली.

राज्यातील अनेक जिल्ह्यांची कामगिरी असमाधानकारक ठरल्याने मुंबई येथील आरोग्य सेवा संचालकांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माघारलेल्या जिल्ह्यांनी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करून आपल्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

Mahakumbh : राज ठाकरेंच्या ‘गंगाजल’ टीकेवर, नितेश राणेंचा ‘संध्याजल’ने हल्ला

इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी

वाशीम जिल्ह्याने सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला आहे. यामुळे इतर जिल्ह्यांनीही वाशीमचा आदर्श घेऊन आरोग्य सेवा सुधारण्यावर भर द्यावा. विदर्भातील इतर जिल्ह्यांनीही अशाच प्रकारे प्रयत्न केले तर पुढील क्रमवारीत त्यांनाही वरच्या स्थानावर येण्याची संधी असेल. वाशीमच्या यशाचा हा आलेख पाहता, महाराष्ट्राची आरोग्य सेवा अधिक दर्जेदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे निश्चित दिसते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!