महाराष्ट्र

Praful Patel : आधी देशासाठी एकत्रीकरण, नंतर पाहू राजकारण 

Operation Sindoor : दहशतवादावर भारताचा चोख प्रहार 

Post View : 25

Author

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात देशप्रेमाचं आणि एकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीत राजकारण बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला.

भारताने नुकतेच पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेनंतर, संपूर्ण देशात एक वेगळाच उत्साह आणि देशभक्तीची भावना उसळलेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली, जिथे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एकत्र आले. राजकारण बाजूला ठेवत भारताच्या एकता आणि अखंडतेच्या मुद्द्यांवर सर्वपक्षांनी एकमुखाने केंद्र सरकारच्या कारवाईचे समर्थन केले.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल उपस्थित होते आणि त्यांनी बैठकीतील चर्चेची माहिती माध्यमांसमोर मांडली. पटेल म्हणाले, जेव्हा भारताच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न असतो, तेव्हा सर्वांनी राजकारण झटकून एकत्र येणे आवश्यक असते. या बैठकीत प्रत्येक पक्षाने देशहितासाठी एकजूट दाखवली, ही अभिमानास्पद बाब आहे.

दहशतवाद्यांचा खात्मा 

पाकिस्तानातून होणाऱ्या सततच्या आतंकवादी घुसखोरीला उत्तर देताना भारताने घेतलेला निर्णय केवळ साहसीच नव्हे तर अत्यंत निर्णायक ठरला. दहशतवादी अड्ड्यांवर नेमकेपणाने केलेल्या हल्ल्यांत अनेक दहशतवाद्यांचा खातमा झाला आहे. शत्रूला भारताची ताकद पुन्हा जाणवली. याबाबत बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, भारताने फक्त संवाद नाही, तर कृतीतून उत्तर दिलं आहे. वीर जवानांचे हे शौर्य आणि केंद्र सरकारचा निर्णय दोन्ही अभिनंदनीय आहेत.

Nana Patole : दुर्योधन सीमापार आला, पण चक्रधारी कृष्ण पुन्हा रणांगणात उतरला

देशावर संकट येते तेव्हा राजकारण बाजूला ठेवून देशप्रेम प्रथम असते, हे यावेळीही स्पष्ट झाले. यावेळी जेव्हा देशावर धोका निर्माण झाला, तेव्हा प्रत्येक भारतीयाने एकसंधपणे देशाच्या पाठीशी उभं राहिलं. अशा क्षणी आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो, असेही पटेल यांनी सांगितले.

योग्य वेळी चर्चा

शरद पवार यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता वर्तवली असताना, त्यावर विचारलेल्या प्रश्नाला प्रफुल पटेल यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. आम्ही सध्या राष्ट्रीय एकतेसाठी येथे आलो आहोत. राजकीय विषयांवर योग्य वेळेला चर्चा करू. सध्या आमच्यासमोर एकत्र येण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार गटात सुरू असलेल्या पक्षप्रवेशांवर बोलताना पटेल यांनी म्हटलं, याबाबत योग्य वेळीच पक्ष भूमिका मांडेल. सध्या मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले आहे. यावर बोलताना पटेल म्हणाले, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ही महायुती एकत्र निवडणुकीत उतरणार आहे. महाराष्ट्रात जेवढं विकास काम महायुती सरकारने केलं आहे. त्यावरून जनतेचा विश्वास महायुतीवर पुन्हा जिंकला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने दाखवलेली धाडसाची आणि न घाबरण्याची भूमिका संपूर्ण देशाला प्रेरणा देणारी आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची एकवटलेली भूमिका आणि देशहितासाठी असलेली समविचारी भूमिका ही भारतीय लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत आहे. देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याची ही भावना भविष्यातही टिकून राहो, हीच अपेक्षा.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!