मोर्शीत मत्स्य विज्ञानाचं नवं केंद्र उभं राहत आहे. पश्चिम विदर्भात शिक्षण, तंत्रज्ञान आणि रोजगाराला मिळणार नवी दिशा.
मोर्शी (अमरावती) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिले मत्स्य विज्ञान महाविद्यालय उभारण्यासाठी भूमिपूजन आणि कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक घटनेने विदर्भाच्या विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची दिशा स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे बदलते स्वरूप, नव्या तंत्रज्ञानाची गरज आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाचे महत्त्व यावर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की मत्स्य व्यवसाय हा केवळ समुद्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर गोड्या पाण्यातूनही मोठ्या प्रमाणात मासेमारी होते आणि यामध्ये प्रचंड आर्थिक संधी आहेत.
अतिरिक्त उत्पन्न
देशातील जवळपास 40 टक्के मासेमारी गोड्या पाण्यातून होते. पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश यांसारख्या राज्यांनी या क्षेत्रात मोठी भरारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरीही आता शेतीबरोबर शेततळ्यांमधून मत्स्यपालन करत असून त्यांना या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी हे महाविद्यालय नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण व संशोधनाचा प्रभावी स्त्रोत ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नीलक्रांती’ संकल्पनेतून प्रेरणा घेत मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रासाठी कृषी कर्ज, किसान क्रेडिट कार्ड, अनुदान आणि प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होतील. यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे वळण्याची नवी दिशा मिळेल.
Bacchu Kadu : तिरंगा शानाचा , पांढरा झेंडा शेतकऱ्यांच्या मानाचा
हजारो एकर येणार ओलिताखाली
अमरावती जिल्ह्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणखी काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मदत केली जाणार आहे. याशिवाय ‘पंढरी मध्यम प्रकल्पा’साठी निधी मंजूर करण्यात आला असून त्यामुळे 23 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच, ‘पीएम मित्र योजने’ अंतर्गत अमरावती जिल्ह्यात दुसरे टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. या पार्कच्या माध्यमातून सुमारे २ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरणार असून कापसाच्या शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग, वस्त्रनिर्मिती आणि सेवा क्षेत्रात नव्या संधींचा उदय होणार आहे.
ग्रामीण स्वयंपूर्णतेचा पाया
मोर्शीत उभा राहणारा मत्स्य विज्ञान महाविद्यालय हा प्रकल्प म्हणजे केवळ शैक्षणिक केंद्र नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्थेतील एक नवीन क्रांती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाद्वारे केवळ विदर्भ नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना नव्या संधींचे दालन खुले होणार आहे. ही मत्स्यक्रांती केवळ मासेमारीपुरती मर्यादित न राहता, ग्रामीण स्वयंपूर्णतेचा खरा पाया ठरेल, असा विश्वास या उपक्रमातून व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे, खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, आमदार राजेश वानखेडे, आमदार प्रविण तायडे, आमदार प्रताप अडसड, आमदार केवलराम काळे, आमदार चैनसुख संचेती, आमदार अनुराधा चव्हाण, तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.