लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी मांडलेल्या मतचोरीच्या मुद्द्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भाजपवर थेट आरोप करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश न मिळाल्यानंतर पक्षाने मतचोरीचा गंभीर आरोप करत भाजप आणि त्यांच्या इकोसिस्टीमला जिथे तिथे घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी एका ठाम आणि आक्रमक वक्तव्यात भाजपवर थेट हल्ला चढवला. राहुल गांधींनी मतचोरीचे ठोस पुरावे देशासमोर मांडले आहेत. तेव्हापासून भाजपची इकोसिस्टीम चळो की पळो अशा अवस्थेत आली आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.
ठाकूर म्हणाल्या की, मत चोरीचं जे वास्तव राहुल गांधींनी समोर ठेवलं आहे, त्यावरून भाजप स्वतःच सिद्ध करत बसलंय की, त्यांनी चूक केली नाही. म्हणजे चोर कुण हे आधीच उघड झालंय. निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की लगेच भाजप उत्तर देते, म्हणजे आयोगाच्या भूमिकेवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतं. आयोगाला प्रश्न विचारल्यास भाजप उत्तर देते. यावरून समजते की, मामला कुछ गडबड है, चोर की दाढी मे तीन का दिख रहा है, अशी घणाघाती टीका ठाकूर यांनी केली.
Prashant Padole : खताच्या वाळवंटातून संघर्षाची मशाल पेटली दिल्ली दरबारात
विश्वास गरजेचा
या संपूर्ण घडामोडीत निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद ठरत असल्याचं ठाकूर यांनी ठासून सांगितलं. हा आयोग का भाजपचं संरक्षण करत आहे? का निवडणूक आयोगाला भाजपचीच भूमिका घ्यावी वाटते? भाजपचा मुखवटा स्वतःच्या चेहऱ्यावरून निवडणूक आयोगाने उतरवायला हवा. कारण जर देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर निवडणूक आयोगावर जनतेचा विश्वास राहणं अत्यंत गरजेचं आहे, असा ठाम इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर केलेल्या ‘चीप खराब’ या वक्तव्यावरही यशोमती ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपने चीप, हार्ड डिस्क अशा शब्दांचा वापर करून लोकशाहीची खिल्ली उडवणं थांबवावं. कारण भाजपने स्वतःचीच सिस्टीम फॉरमॅट केली आहे. लोकशाहीच्या मूल्यांना डिलीट केलंय. निवडणूक म्हणजे भाजपसाठी एक गेम झाला आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत त्यांनी खेळखंडोबा केला आणि आता तो उघड होतोय, असा स्फोटक आरोप ठाकूर यांनी केला.
Mahayuti : शेतकऱ्यांच्या आशांचा पालव, सरकारच्या कृतीने फुलणार
जोरदार लढा
यशोमती ठाकूर यांच्या या घणाघाती टीकेने काँग्रेसची रणनीती स्पष्ट होते की, आता केवळ निषेध पुरेसा नाही, तर पुराव्यांच्या आधारे जनतेच्या मनात उभा राहिलेला संशय सत्ताधाऱ्यांवर रोखून ठेवायचा आहे. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांकडे थेट उत्तरांची मागणी करत, त्यांनी जनतेसाठी हा लढा असल्याचं म्हटलं आहे.
हा प्रश्न नुसता निवडणुकीतील निकालाचा नाही, तर देशाच्या लोकशाहीचा आहे. निवडणूक आयोगाने स्वतः पुढे येऊन सत्य मांडावं, राहुल गांधींनी दिलेल्या पुराव्यांचं उत्तर द्यावं आणि जनतेचा विश्वास परत मिळवावा. ही लढाई आता केवळ काँग्रेसची नाही. ही प्रत्येक जागरूक नागरिकाची लढाई आहे, अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधींनी दिलेल्या पुराव्यांची ठिणगी आणि यशोमती ठाकूर यांनी ओतलेलं राजकीय पेट्रोल. यातून एक स्फोटक लढा उभा राहत आहे. त्याचे पडसाद लवकरच देशभर ऐकू येणार, याची चाहूल लागली आहे.