महाराष्ट्र

Yashomati Thakur : मोदी सरकारचा हुकूमशाही मार्ग लोकशाहीसाठी धोकादायक

Congress : विरोधकांना अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न 

Post View : 14

Author

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोदी सरकारच्या नव्या विधेयकावर गंभीर इशारा दिला आहे. या विधेयकामुळे लोकशाहीची मूलभूत रचना आणि न्यायव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत तीन महत्त्वाचे विधेयक मांडले. यामध्ये प्रस्ताव आहे की जर एखाद्या सध्याच्या मंत्री, मुख्यमंत्री किंवा अगदी पंतप्रधानाला पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या प्रकरणासाठी सलग 30 दिवस ताब्यात किंवा अटक करण्यात आली, तर त्यांना एका महिन्याच्या आत आपले पद सोडावे लागेल.

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी या विधेयकाला लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारे हुकूमशाही उपाय म्हणून वर्णन केले. त्यांच्या मते, केंद्रीय तपास यंत्रणांनी एखाद्या मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांना अटक केली, तरी न्यायालय दोष सिद्ध होईपर्यंत पदावर राहण्याचा नैसर्गिक हक्क हा विधेयक रद्द करत आहे. त्यामुळे विरोधी पक्षांच्या लोकनियुक्त सरकारांना अस्थिर करण्याचा धोका निर्माण होतो.

Mira Borwankar: खाकीचे राजकारण, न्यायाचे अडथळे

न्याय प्रक्रियेवर परिणाम

आजपर्यंत घटनेनुसार केवळ न्यायालयीन दोष सिद्ध झाल्यानंतर लोकप्रतिनिधींना पदावरून हटवण्याची तरतूद होती. मात्र, हे नवीन विधेयक फक्त ‘अटक’ या घटनाप्रकरणावर आधारित निर्णय देऊन नैसर्गिक न्याय प्रक्रियेचे उल्लंघन करत आहे. यामुळे राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय लोकशाही व्यवस्थेतील पारदर्शकता धोक्यात येते. यशोमती ठाकूर यांनी या विधेयकामुळे नागरिकांच्या अधिकारांना थेट धोका निर्माण होईल असे स्पष्ट केले.

या विधेयकामुळे संघीय रचना आणि न्यायपालिका यांच्यावर थेट आघात होत आहे. सीबीआय-ईडी सारख्या तपास यंत्रणांचा राजकीय हेतूने गैरवापर होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्री-मंत्र्यांना खोट्या आरोपांखाली अटक करणे आणि सुनावणीपूर्वीच पदावरून हटवणे हा खरा धोका असल्याचे यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट केले.

Mira Borwankar: खाकीचे राजकारण, न्यायाचे अडथळे

लोकशाहीचे संरक्षण

भाजप निवडणुकीत हरवू न शकलेल्या विरोधकांविरोधात असे जुलमी कायदे करून विरोधकांना पदावरून हटवण्याचा डाव आखत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी म्हटले. जनतेने थेट निवडून दिलेल्या सरकारांना अस्थिर करण्यासाठी हे विधेयक कायद्याचेच शस्त्र बनवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकशाहीच्या संरक्षणासाठी या विधेयकाविरोधात निर्धाराने आवाज उठवणे आवश्यक आहे. अन्यथा ‘अटक म्हणजेच अपराध सिद्ध’ या अपप्रचाराद्वारे लोकशाहीला हुकूमशाहीकडे वळवण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होईल. यशोमती ठाकूर यांनी न्यायव्यवस्था, लोकशाही आणि नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!