बीड जिल्ह्यात केज तहसील कार्यालयासमोर शेतकरी महिलांच्या बेमुदत उपोषणात एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. यावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलेल्या शेतकरी महिलांपैकी एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण मराठवाडा हादरला आहे. या घटनेमागे आहे एका खासगी वीज प्रकल्प कंपनीचा मनमानी आणि आक्रामक कारभार आणि त्याला पाठीशी घालणारी प्रशासनाची गप्प भूमिका. उपोषण हे केवळ शेतजमिनीसाठी सुरू नव्हतं, ते होता संघर्ष एका हक्कासाठी, एका महिलेसाठी आणि तिच्या आवाजासाठी, जो शेवटपर्यंत ऐकला गेला नाही.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी थेट सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महायुती सरकारला लाज वाटली पाहिजे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उद्देशून सवाल केला आहे की, या महिलांचा आक्रोश ऐकणार आहात का?
प्रशासनाचं दुर्लक्ष
ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितलं की, या महिलेचा मृत्यू हा फक्त वैयक्तिक शोकांतिका नाही, तर तो व्यवस्थेच्या संवेदनाशून्यतेचा आरसाच आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अवैध पोल उभारले गेले, धमक्या दिल्या गेल्या आणि वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केलं. त्याचं हे विदारक परिणाम आहे, असं सांगताना त्यांनी सरकारवर टीकेची आणि संतापाची लाट उठवली.
त्यांचं म्हणणं आहे की, आवादा कंपनीने केवळ नियमभंगच नाही केला, तर स्थानिक गावगुंडांच्या मदतीने शेतकऱ्यांना दबावत ठेवलं. शेतकऱ्यांची जमीन, त्यांचा आत्मसन्मान, आणि शेवटी त्यांचा प्राणच गमावला गेला आणि ही सर्व गोष्ट प्रशासनाच्या नजरेसमोर, पण कृतीशून्यतेच्या सावलीत. महिलांचा सन्मान, शेतकऱ्यांचा आदर, या घोषणा केवळ निवडणुकीपुरत्याच असतात का? असा प्रश्न ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. त्या म्हणाल्या की, महिला दिनाच्या कार्यक्रमात फुलं देणाऱ्यांना आता या मरण पावलेल्या महिलेच्या कुटुंबाला काय द्यायचं आहे? शाबासकी की शांतता?
संतप्त वातावरण
त्यानंतर त्या ठामपणे म्हणाल्या की, “जर तुमच्यात माणुसकी शिल्लक असेल, तर तातडीने या कंपनीवर गुन्हे दाखल करा. शेतकऱ्यांना न्याय द्या. ही लढाई आता थांबवली जाणार नाही. आम्ही आवाज दाबू देणार नाही. या सर्व प्रकारामुळे केज तालुक्यात संतप्त वातावरण आहे. शेतकरी, महिलावर्ग, आणि सामाजिक संघटना या घटनेविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. बीड जिल्ह्यातील प्रशासन आणि सरकारच्या विरोधात असंतोष उफाळून आला आहे.
या घटनेने फक्त एका महिलेचा जीव घेतला नाही, तर शासन-प्रशासनाच्या जबाबदारीचा आणि संवेदनशीलतेचा असंख्य प्रश्न उभे केले आहेत. न्यायासाठी पुकारलेला आक्रोश आता एक स्फोटक लाट बनतो आहे, जी कोणतंही सरकार हादरवू शकते.