कर्नाटक बेळगावच्या सौंदत्ती तालुक्यात मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी म्हणून शाळेच्या पाण्यात विष टाकून ११ विद्यार्थ्यांना विषबाधा केली गेली.
कर्नाटकच्या सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात एक अशी घटना घडली आहे, जी केवळ शिक्षणव्यवस्थेवरच नव्हे तर मानवी मूल्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. एका मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी, या विखारी हेतूने शाळेच्या पाण्याच्या टाकीत विष कालवले गेले. या भयंकर प्रकारात ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, सुदैवाने वेळेवर उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचले. ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या तपासानंतर समोर आलेल्या माहितीने संपूर्ण समाज हेलावून गेला आहे. १३ वर्षांपासून या शाळेत सेवेत असलेले सुलेमान घोरी नायक हे सध्या हुलीकट्टी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत.
मुख्याध्यापकाच्या मुस्लिम ओळखीचा काही कट्टर विचारसरणीच्या लोकांना त्रास होता. त्यामुळे ‘तो आपल्या गावातील शाळेत मुख्याध्यापक नको’ या भूमिकेतून थेट विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ केला गेला. पोलिसांनी या प्रकरणात सागर सक्रेप्पा पाटील, नागनगौडा बसाप्पा पाटील आणि कृष्णा यमनाप्पा मादर या तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, यातील एक आरोपी राम सेनेचा स्थानिक पदाधिकारी असल्याचे उघड झाले आहे. या घटनेने धार्मिक कट्टरतेचा विद्रूप चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.
Vijay Wadettiwar : मोबाईलच्या ‘स्क्रोल’वरून मनाच्या पानांकडे वळवण्याचा प्रयत्न
समाजासाठी धोक्याची घंटा
संपूर्ण कट एक प्रकारे धार्मिक द्वेषातून प्रेरित असल्याचे स्पष्ट होत आहे. एका शिक्षकाचा धर्म न आवडल्यामुळे विद्यार्थ्यांना विष दिले जाते. हा प्रकार केवळ व्यक्तीविरोधी नाही, तर संपूर्ण समाजविरोधी आहे. या प्रकाराचा हेतू मुख्याध्यापकावर दोष ढकलून त्याची बदली घडवून आणण्याचा होता. या घटनेवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी थेट धार्मिक कट्टरतेवरच हल्लाबोल करत म्हटले, धार्मिक कट्टरतेचा विकृतपणा कोणत्या थराला पोहोचला आहे, याचे हे भयावह उदाहरण आहे.
एका मुस्लिम मुख्याध्यापकाच्या उपस्थितीचा राग धरून निष्पाप विद्यार्थ्यांवर विषप्रयोग केला गेला. ही घटना धर्मवेड्यांच्या अमानवी विकृतीचे दर्शन घडवते. त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला, आज जर शिक्षक मुस्लीम असला म्हणून त्याच्याविरुद्ध असा कट रचला जात असेल, तर उद्या एखादा डॉक्टर, पोलिस अधिकारी, किंवा न्यायाधीश असला तरी काय याच नियोजनाने त्याच्या कामावर गदा आणली जाणार आहे का? या घृणास्पद प्रकारावर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून, अशा अमानुष कटांचा संबंध धर्माशी नसून, तो विकृत मानसिकतेशी आहे. या प्रकारात गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.