
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी योजनांची यवतमाळ जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या.
केंद्र सरकारच्या आदिवासी व आदिम जमातींसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनमन आणि धरती आबा या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असा स्पष्ट संदेश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. या योजनांतर्गत एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत मंत्री डॉ. वुईके यांनी विविध योजनांची व प्रकल्पांची माहिती घेतली.

यामध्ये प्रधानमंत्री जनमन, धरती आबा, शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम, जिल्हा नियोजन समितीचा मागील वर्षाचा खर्च, खनिज प्रतिष्ठान व पाणी टंचाई या बाबींचा समावेश होता. पीएम जनमन योजनेमध्ये एकूण 13 विभागांचा समावेश असून त्यांचे उद्दिष्ट आदिवासी लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ देणे हे आहे. धरती आबा योजनेंतर्गत देखील आदिवासींसाठी विशेष योजना राबविल्या जात आहेत. या योजना केवळ कागदावर न राहता, जमिनीवर प्रत्यक्षात उतरल्या पाहिजेत, असे ठाम मत डॉ. वुईके यांनी व्यक्त केले.
Nagpur : मुख्यमंत्र्यांचा स्वच्छतेचा मंत्र; भोंडेवाडीतून हरीत क्रांतीची चाहूल
विकासासाठी सहभाग
मंत्री म्हणून आपल्या जबाबदारीची जाणीव व्यक्त करत त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, तेंदुपत्ता संकलन निधीचे वितरण, तसेच एकत्रित आदिवासी गावे वेगळी करून स्वतंत्र ग्रामपंचायतींची निर्मिती याबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले. शंभर दिवस सुधारणा कार्यक्रमात जिल्ह्याने समाधानकारक काम केले असले तरी राज्यस्तरावर गौरव मिळवण्यासाठी अजून पावले टाकणे आवश्यक आहे, असे सांगत डॉ. वुईके यांनी येणाऱ्या 150 दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमात अधिक ठोस कामगिरी करण्याचे आवाहन केले.
जिल्हा वार्षिक योजना व खनिज प्रतिष्ठान यांची कामे करताना लोकप्रतिनिधींचा सल्ला व सहभाग घेण्यावर भर दिला. विभागप्रमुखांनी लोकप्रतिनिधींशी सातत्याने संपर्कात राहावे, त्यांच्या सूचनांची दखल घ्यावी, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या गंभीर समस्येचा आढावा घेताना, सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांवर डॉ. वुईके यांनी समाधान व्यक्त केले. एकूण 4 कोटी 31 लाख रुपयांचा आराखडा राबविण्यात येत आहे.
Nagpur : बावनकुळे यांचा बुलडोजर सुरू, अतिक्रमण साफ, नाले मोकळे
गावांत पाणीपुरवठा
468 गावांमध्ये 539 कामे प्रस्तावित आहेत. सध्या 34 टँकरद्वारे पाणीपुरवठा, 189 विहिरी व 31 बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित विहिरींच्या शिल्लक रकमेचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. या बैठकीत राजू तोडसाम व किसन वानखेडे यांनी महत्त्वाचे प्रश्न मांडले. यावर तात्काळ उपाययोजना राबविण्याचे आश्वासन डॉ. वुईके यांनी दिले. विविध विभागांच्या प्रमुखांनी आपापल्या विभागांची सविस्तर माहिती सादर केली.