नागपूरच्या ऐतिहासिक विधानभवनात ‘युथ पाइल लिमिट, राष्ट्रीय युवा संसद 2025’चा प्रेरणादायी उद्गाता ठरला. देशभरातील 150 हून अधिक तरुण प्रतिनिधींनी विचार, नेतृत्व आणि लोकशाहीचा झेंडा अभिमानाने फडकवला.
महाराष्ट्र विधानभवनात दोन दिवसीय इतिहास घडला. पण यावेळी नेते नव्हते, नव्या विचारांचे तरुण होते. ‘लोकशाही ही फक्त मतांपुरती मर्यादित नाही, ती विचारांची बैठक असते’ हे सिद्ध करणारी ‘युथ पाइल लिमिट, राष्ट्रीय युवा संसद 2025’ ही राष्ट्रीय स्तरावरील युवा संसद नागपूरमध्ये ऐतिहासिक पातळीवर पार पडली. 29 व 30 जुलै रोजी, नागपूरच्या विधिमंडळ भवनात देशभरातील 150 तरुण प्रतिनिधींनी एकत्र येत संसदेशी समांतर शिस्तीने विचारांची, संवादाची आणि नेतृत्वाची नवी क्रांती घडवली.
ही युवा संसद म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, ती एक चळवळ होती. जिथे उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतून आलेले युवक आपापले विचार, अनुभव आणि दृष्टिकोन घेऊन आले आणि ते नागपूरच्या राजकीय मुळाशी भिडले. युवा संसदेस सुरुवात झाली ती आमदार डॉ. आशीष देशमुख यांच्या प्रेरणादायी भाषणाने. त्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी संसदेसारख्या शिस्तबद्ध प्रक्रियेतून जे संवाद साधले, ते लोकशाहीचे भविष्य उजळवणारे आहे.
Devendra Fadnavis : पणतीपासून पॅनलपर्यंत, महाराष्ट्राच्या ऊर्जायात्रेचा सौरसंकल्प
चर्चा, विवाद आणि निर्णय
समाजशास्त्र, लोकनीती, पर्यावरण, शिक्षण, प्रशासन अशा महत्त्वाच्या विषयांवर समित्यांद्वारे सखोल चर्चासत्रे आयोजित करण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या सत्रांतून प्रतिनिधींनी ज्या पद्धतीने धोरणांचे मांडणी, त्यावरील विवाद व संवाद केले, त्यातून नव्या विचारांची खऱ्या अर्थाने ‘मंथन’ घडली. कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये आमदार डॉ. परिणय फुके, माजी आमदार डॉ. गिरीश व्यास, पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल आणि सेवानिवृत्त सनदी अधिकारी कनोजिया यांचा समावेश होता. त्यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला अनुभवाची व विचारांची उंची मिळाली.
दोन दिवसांच्या विचारांच्या या पर्वानंतर समारोपप्रसंगी उपस्थित होते. राजे मुधोजी भोसले आणि डॉ. एल. एन. मालवीय (मालवीय उद्योग समूह, भोपाळ). डॉ. मालवीय म्हणाले, देशाच्या भविष्यासाठी अशी मंचं ही काळाची गरज आहे. नागपूरसारख्या ऐतिहासिक शहरात ही चेतना प्रज्वलित होते आहे, हे अभिमानास्पद आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यात विश्वजित रमेश चोपडे आणि देवयानी रमेश चोपडे यांच्या नेतृत्वाखालील 30 सदस्यीय युवा आयोजन समितीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. रेहान अली आणि आर्यन कोरडे यांसारख्या युवा समन्वयकांनी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावर कार्यकुशलतेचा प्रत्यय दिला.
नव्या वाटचालीची ग्वाही
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रतिनिधींना प्रमाणपत्र देण्यात आले. विविध सत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी गौरवचिन्हं देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आयोजक विश्वजित चोपडे यांनी सांगितले, युथ पाइल लिमिट’ हा उपक्रम केवळ वक्तृत्व नव्हे तर नेतृत्वासाठी युवक घडवतोय. आम्ही ही चळवळ देशभर पोहोचवणार आहोत. ‘युथ पाइल लिमिट’ ही उपक्रममालिका केवळ एक मंच नाही, तर नवभारताच्या विचारवंत पिढीचा उगमबिंदू आहे. हे उपक्रम म्हणजे भाषणाचा देखावा नव्हे, तर संवादातून विचारांची पायाभरणी करणारा आणि नेतृत्वाच्या क्षितिजाकडे झेपावणारा खरा लोकशाही उत्सव आहे.
नागपूरने पुन्हा एकदा सिद्ध केलं की, ही केवळ विदर्भाची राजकीय राजधानी नाही, तर विचारांची जन्मभूमी आहे. ‘युथ पाइल लिमिट राष्ट्रीय युवा संसद 2025’ ही फक्त घटना नव्हती, ती होती नव्या भारताच्या मनात उमटणारी पहिली लोकशाही घंटा.