संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाचे भक्ती आणि आनंदाचे रंग उसळत असताना, नागपुरातील एका भीषण स्फोटाने संपूर्ण शहर हादरवून ठेवले आहे.
रात्रीच्या गडद अंधारात, जेव्हा गणेशोत्सवाच्या उत्साहाने नागपूर शहर आंनदात रंगले होते. तेव्हा बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत एका भीषण स्फोटाने सर्वत्र हादरा निर्माण केला. मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडलेल्या या भयंकर घटनेने एका कामगाराचा जीव घेतला. तर १७ जण जखमी झाले. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, कंपनीच्या इमारतीचे तुकडे शेकडो मीटर लांब उडाले. या मलब्याच्या आघाताने अनेक कामगारांना गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने नागपूरच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. पण चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. या स्फोटाच्या काही क्षणांपूर्वी, सीबी वन या प्लांटमधून धुराचे लोट बाहेर पडत होते. अनुभवी कामगारांना धोक्याची चाहूल लागली आणि त्यांनी बाहेर पळण्याचा प्रयत्न केला.
परंतु मयूर गणवीर या कामगाराला वेळेत बाहेर पडता आले नाही. स्फोटाच्या त्या भयंकर क्षणी त्यांचा जीव गेला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की, आजूबाजूच्या परिसरातही कंपने जाणवली. कंपनीच्या आवारात धूळ आणि धुराचे ढग पसरले. कामगारांच्या किंकाळ्यांनी रात्र भेदली. या घटनेने गणेशोत्सवाच्या आनंदावर काळ्या ढगांचे सावट पसरले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या वसंतराव देशमुख प्रतिष्ठानच्या गाडीने सहा जखमींना त्वरित रुग्णालयात पोहोचवले. सकाळी पुन्हा घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी ते परतले आणि स्थानिक प्रशासन तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. ही घटना अत्यंत दुखद आहे. जीव गमावलेल्या कामगाराला भावपूर्ण श्रद्धांजली.
सुरक्षेचा गंभीर प्रश्न
जखमी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना, असे त्यांनी भावूक होऊन सांगितले. त्यांनी कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर नियमावली लागू करण्याची मागणीही केली आहे. अनिल देशमुख यांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन शासनाला आवाहन केले की, अशा कंपन्यांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजनांवर कडक लक्ष ठेवले पाहिजे. कामगारांचे जीव धोक्यात घालणाऱ्या या घटना वारंवार घडत आहेत. सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला आणि पोलिसांना या स्फोटाच्या कारणांचा सखोल तपास करण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही १७ डिसेंबर २०२३ रोजी सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ कामगारांचा मृत्यू झाला होता. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक नागरिक आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्फोटाने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे की, अशा धोकादायक उद्योगांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना किती प्रभावी आहेत? कंपनीच्या सिव्ही युनिटमध्ये स्फोट झाला असून, जखमींपैकी १४ जणांना दंदे हॉस्पिटलमध्ये, तर दोघांना डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राठी हॉस्पिटल, धंतोली येथे दाखल करण्यात आले आहे. कंपनीने सुरक्षेच्या कारणास्तव आवारात प्रवेश बंद केला असून, दोन अॅम्ब्युलन्सद्वारे जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेने नागपूर जिल्ह्यातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात ही दुर्घटना सर्वांसाठी एक धक्कादायक स्मरणपत्र ठरली आहे की, मानवी जीव आणि सुरक्षा यांना सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे.
