भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या सौगात ए मोदी योजनेवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत, त्यांना औरंगजेब फॅन क्लबचे म्होरके म्हणत हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला.
महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा घमासान सुरू झाले आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या ‘सौगात ए मोदी’ योजनेवर जोरदार टीका करताना, हा केवळ निवडणुकीचा खेळ असल्याचे म्हटले. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर प्रहार केला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना थेट ‘औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या’ अशी उपमा दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी भाजपच्या योजना आणि हिंदुत्व धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली. ‘भाजपने आधी हिंदू धर्म संकटात असल्याचे सांगितले, आता ते सौगात ए मोदी म्हणत आहेत. हा विकासाचा कार्यक्रम नाही तर, सत्ता मिळवण्याचा खेळ आहे, असे ते म्हणाले. वर्षभर मुस्लिम समाजाच्या नावाने ‘शिमगा’ करायचा, आणि निवडणूकीला ‘पुरणपोळी’ द्यायची? असेही ठाकरे म्हणाले.
काँग्रेसवरही हल्लाबोल
ठाकरेंच्या या प्रतिक्रियेला बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले की, ‘सौगात ए मोदी ही योजना नाही, तर विकासाची गॅरंटी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला 24 तास वीज, पाणी, रस्ते, घरे आणि रोजगार मिळत आहेत. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राला काय दिले? ते घरी बसले आणि जनतेशी नाळ तोडली.’ असा आरोप बावनकुळेंनी केला आहे.
बावनकुळे यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंना चांगलेच लक्ष्य केले. ‘हिंदुत्व आमच्या रक्तात आहे, पण उद्धव ठाकरेंनी ते सत्तेसाठी काँग्रेसच्या दारात जाऊन गहाण ठेवले. त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना घरी बसवले. हिंदुत्वावर बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे ते म्हणाले.
विकास आमची प्राथमिकता
ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल करताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले. “भाजपने विष वाटले, आता धान्य वाटत आहेत. पण हे केवळ बिहार निवडणुकीपर्यंतच राहणार का? भाजपने स्पष्ट करावे की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बावनकुळे यावर म्हणाले, ‘गुन्हेगार, अतिक्रमण करणारे आणि समाजविघातक तत्त्वांना संरक्षण देणाऱ्या लोकांना उद्धव ठाकरेंनी जवळ केले. त्यांनी आधी जनतेला उत्तर द्यावे की असे लोक त्यांना का प्रिय आहेत?’
भाजपने आपल्या धोरणांवर ठाम राहून विकासाला प्राधान्य दिले आहे. बावनकुळे यांनी नमूद केले की, देशासाठी काम करणाऱ्या मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही. आमचे सरकार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्यावरून ही रस्सीखेच सुरूच राहणार आहे, पण जनतेच्या मनात यामुळे नेमके काय विचार निर्माण होतील, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल.
