वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद उफाळला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
वक्फ सुधारणा विधेयकावरून महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही खळबळ सुरूच आहे. 2 एप्रिल रोजी हे विधेयक मंजूर झालं असलं तरी, याच्या अनुषंगाने आरोप प्रत्यारोपांचं सत्र अद्यापही थांबायचं नाव घेत नाही. काँग्रेसने या विधेयकाला कडाडून विरोध दर्शवला होता, तर शिवसेना उद्धव ठाकरे गट सुरुवातीपासूनच या मुद्द्यावर आक्रमक होती. दुसरीकडे, भाजपने या विधेयकाला संपूर्ण पाठिंबा दिला आणि अखेर मध्यरात्री संसदेत ते बहुमताने मंजूर करण्यात आलं. मात्र यावरून आता भाजपने यांना परत एकदा उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे.
वक्फ विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाला भाजपने जोरदार टोले लगावले आहेत. भाजपचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वक्फ विधेयकाला विरोध केल्यामुळे उद्धव ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी गट सोडला. बिलाला विरोध केला म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पदाधिकारी भाजपमध्ये सामील झाले, असा दावा त्यांनी केला आहे. आठ एप्रिलचा दिवस भाजपसाठी आनंदाचा असल्याचंही बावनकुळे म्हणाले. भारताचे माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
क्रिकेटपटूंचाही प्रवेश
केदार जाधव यांच्या प्रवेशसोबतच काँग्रेसमधील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत असलेल्या काही काँग्रेस नेत्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बसमत आणि सांगलीतूनही मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. वक्फ विधेयकाबाबत ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज झाले आहे. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांकडून आम्हाला फोन येत आहेत. ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. लोकसभेत दोन एप्रिलला वक्फ दुरुस्ती विधेयक सादर झालं. त्यावर तब्बल 12 तास चर्चा झाली आणि अखेर बहुमताने ते मंजूर झालं. मात्र, ठाकरे गटाने या विधेयकाला विरोध केला. यामुळे ठाकरे गटाला राजकीय तोटा होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. बावनकुळे यांनी यावर भाष्य करताना सांगितलं होते की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपासून उद्धव ठाकरे वेगळे झाले आहेत.
राजकारणात खळबळ
उद्धव ठाकरे यांनी आता काँग्रेसचे विचार स्वीकारल्याचं हे आणखी एक उदाहरण आहे, असे बावनकुळेंनी सांगितले होते. माजी क्रिकेटपटू केदार जाधव याने भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. वक्फ विधेयकाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना राजकीय किंमत मोजावी लागेल का, हा प्रश्न आता निर्माण होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसची जवळीक वाढत असल्याचा दावा भाजपकडून वारंवार केला जात आहे. त्यामुळे भविष्यात ठाकरे गटाच्या राजकीय अस्तित्वावर काय परिणाम होतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
