नागपूर पोलिसांनी अमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात मोठी मोहीम हाती घेत प्रमुख तस्करांच्या मालमत्तांची यादी नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे.
Narco War : नागपूर शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या व्यापाराला आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. प्रमुख अमली पदार्थ विक्रेते आणि या अवैध धंद्यामागील सूत्रधारांची यादी तसेच त्यांच्या निवासी पत्त्यांची माहिती नागपूर महानगरपालिकेकडे (NMC) सोपवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे संबंधित मालमत्तांवर पाडकामाची कारवाई करण्याचा विचार केला जात आहे.
नागपूर महापालिकेतील लोकप्रतिनिधींसोबत आयोजित आढावा बैठकीत नागपूरचे मावळते पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत जनप्रतिनिधी आणि नागरिकांनी अधिक सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अमली पदार्थांच्या मोठ्या तस्करांशी संबंधित मालमत्तांवर कारवाई झाल्यास गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण होईल आणि संघटित अमली पदार्थ गुन्हेगारीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असा ठाम संदेश जाईल, असे त्यांनी सांगितले.
संशयितांची यादी
पोलिसांनी केवळ संशयित व ओळख पटलेल्या गुन्हेगारांची माहिती महानगरपालिकेला दिली आहे. संबंधित इमारत किंवा मालमत्ता पाडण्यास पात्र आहे की नाही, याचा अंतिम निर्णय कायदेशीर तरतुदींनुसार महानगरपालिका प्रशासन घेणार असल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले. महापौर नीता ठाकरे यांना ही यादी पोलिस आयुक्तांनी सुपूर्द केली.
आयुक्तांनी जनसहभागाच्या महत्त्वावर भर दिला. सामाजिक बदनामी किंवा सूड उगवला जाण्याच्या भीतीमुळे अनेक नागरिक अमली पदार्थांच्या हालचालींबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करतात, असे त्यांनी नमूद केले. नागरिकांनी दिलेली माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल आणि प्रत्येक विश्वसनीय तक्रारीवर तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोणताही पोलीस कर्मचारी बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असल्यास त्याची माहिती देण्याचे आवाहन करत सिंघल यांनी अलीकडील काळात गैरवर्तनाच्या प्रकरणांमध्ये आठ ते दहा पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती दिली. नागपूर पोलिसांची ही मोहीम शहराला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
मनपाचे सहकार्य
उपराजधानीतून ड्रग्सचा विळखा मोडीत काढण्यासाठी नागपूर महापालिका पोलिसांनी पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी महापौर नीता ठाकरे आणि स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानी दाणी यांनी दिले. पोलिसांकडून आलेल्या यादीवर गंभीर विचार करण्यात येईल. त्यानंतर तस्करांची मालमत्ता पाडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे ठाकरे आणि दाणी यांनी सांगितले.
नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्सची तस्करी वाढत आहे. आतापर्यंत पोलिसांनी 1 हजार 515 तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 23 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर व्यतिरिक्त वर्धा येथेही एमडी ड्रग्स तयार करणारा कारखाना सुरू होता. त्यामुळे विदर्भात ड्रग्स तस्करांनी हातपाय पसरल्याचे दिसत आहे.
