भंडारा जिल्हा भाजपची निवडणूक होऊ घातली आहे. नवीन जिल्हाध्यक्ष निवडताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे 20 टक्क्यांची मागणी होऊ लागली आहे.
पूर्व विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या भंडाऱ्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक होऊ घातली आहे. या पदासाठी विद्यमान अध्यक्षांनी पुन्हा एकदा पदाधिकाऱ्यांकडे हात जोडून प्रार्थना करणे सुरू केले आहे. आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळावी, अशी विनंती विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी सर्वांना केली आहे. मात्र आम्हाला आता आमचे 20 टक्के द्या, असा आग्रह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे धरण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यासाठी 20 टक्के पदं अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. यावेळी भंडाऱ्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला प्रवर्गातूनच जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रवर्गातून प्रचंड कुवत आणि संघटन शक्ती असलेले नाव चर्चेत आहे. या नावाची थेट स्पर्धा विद्यमान जिल्हाध्यक्षांसोबत आहे. मात्र प्रदेश पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाते, याची उत्सुकता सर्वांना आहे.
Prataprao Jadhav : वडाळीच्या जलसमाधी आंदोलनाने हादरलं बुलढाणा
चूरसपूर्ण सामना
यावेळी भंडारा जिल्हा भारतीय जनता पार्टीमधील निवडणूक चूरसपूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील भाजपला सक्षम करण्यासाठी नवीन व्यक्तीकडे नेतृत्व सोपवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. मात्र विद्यमान जिल्हाध्यक्ष पद आपल्याकडेच कायम राहावे यासाठी प्रचंड ताकद लावत आहेत. जिल्हाध्यक्षांकडून भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना मेसेजही गेले आहेत. अनेकांशी त्यांनी फोनवर देखील संवाद साधला आहे. आपल्याला पुन्हा संधी मिळावी यासाठी आपले नाव सुचवले जावे अशी विनंती त्यांनी केली आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपला आपले संघटन मजबूत ठेवण्याची गरज आहे. अलीकडेच भंडारा जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसने महायुतीवर कुरघोडी केली. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना हाताशी धरत काँग्रेसने जिल्हा परिषदेमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले. या राजकीय खेळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने देखील मोलाची भूमिका निभावली. महायुती धर्म न पाळणाऱ्या नेत्यांना राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीकडून मात्र यासंदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नव्हती. त्यामुळे जिल्हाध्यक्षांच्या निवडणुकीतून भाजप कोणाला कोणता संदेश देणार? याची उत्सुकता सर्वांमध्ये आहे.
भाजपच्या नवीन जिल्हाध्यक्षांना आगामी निवडणुकीसाठी चांगलीच तयारी करावी लागणार आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचे आव्हान भाजपला पेलावे लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंदा भंडारा जिल्ह्याला त्यांच्या हक्कातील 20 टक्क्यांपैकी अध्यक्ष मिळावा, अशी चौफेर मागणी आहे.
जिल्हाध्यक्षांंबद्दल नाराजी
अलीकडेच झालेल्या मंडळ निवडणुकीमध्ये ज्यांची नावे नव्हती त्यांनाही पद देण्यात आले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. ही संपूर्ण नाराजी विद्यमान जिल्हाध्यक्षांवर आहे. ज्यांची नावेच नव्हती, त्यांना पद कसे देण्यात आले? हा प्रश्न भाजपमधील अनेकांना पडला आहे. अशात जिल्हाध्यक्षाच्या निवडणुकीत पदाधिकाऱ्यांना आलेले फोन कितपत प्रभावी ठरतील, हे बघण्यासारखे आहे.
