प्रशासन

Prataprao Jadhav : वडाळीच्या जलसमाधी आंदोलनाने हादरलं बुलढाणा

Buldhana : केंद्रीय मंत्र्यांच्या तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई

Post View : 57

Author

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या तालुक्यातील वडाळी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांनी 80 फूट खोल विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तापमानाने 43 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत पाणीटंचाईने थैमान घातले आहे. असे असताना, मेहकर तालुक्यातील वडाळी गावाने आपल्या संतापाचा आवाज देशभर पोहोचवला आहे. ग्रामस्थांनी तब्बल 80 फूट खोल विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.

प्रशासनाच्या पोकळ आश्वासनांमुळे त्रस्त झालेल्या वडाळीतील नागरिकांनी अखेर थेट आंदोलनाचा मार्ग पत्करला. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या तालुक्यात ही बिकट परिस्थिती असताना देखील ठोस उपाययोजना न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आहे. जिल्हा प्रशासनाने पाण्याचा प्रश्न केवळ कागदोपत्री योजना आणि बैठकीपुरता मर्यादित ठेवला आहे, ही भावना नागरिकांमध्ये प्रबळ झाली आहे.

Future Nation: मेक इन इंडिया; दशकानंतरची स्वप्नपूर्ती

ग्रामीण संतापाचा उद्रेक

वडाळी गाव प्रत्येक वर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जाते. यंदा परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले. तालुका प्रशासनाकडे मागणी केली गेली. पण दरवेळी आश्वासने देण्यात आली आणि प्रत्यक्षात काहीही बदल घडला नाही. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठाही अपुरा आणि अनियमित आहे.

पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीने थकलेल्या वडाळीच्या ग्रामस्थांनी आता आपल्या जगण्याच्या हक्कासाठी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. 80 फूट खोल विहिरीत उतरून पाणी द्या, नाहीतर आम्ही प्राण सोडू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. जिवाच्या आकांताने सुरू केलेले हे आंदोलन प्रशासनाला जाग आणणारे ठरले आहे. उन्हाच्या कडाक्यात विहिरीत उतरलेले हे आंदोलन आता संपूर्ण जिल्ह्याच्या लक्षात आले आहे.

High Court : प्रयोगशाळा सहाय्यकांच्या संघर्षाला यश

शासनाला इशारा

बुलढाणा जिल्ह्यातील पाणीटंचाई ही नित्याची समस्या आहे. तरी यावर ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. जलसंधारण, बंधारे, टंचाईग्रस्त गावांची जलवाहिनी यांसारख्या योजनांची केवळ चर्चा होते. प्रत्यक्षात कामे मात्र धिम्या गतीने किंवा कागदोपत्रीच राहतात. याचा फटका वडाळीप्रमाणेच इतर गावांनाही बसत आहे.

तालुक्याच्या नेतृत्वात असलेले वरिष्ठ नेतेही या प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचे चित्र ग्रामीण भागात उमटत आहे. नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. प्रशासनाच्या विरोधात संतापाची लाट उसळत आहे. जर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर बुलढाण्यातील जलसंघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

वडाळीच्या ग्रामस्थांनी उचललेले पाऊल संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मोठा इशारा ठरले आहे. जलसंवर्धन आणि टंचाई निवारणाच्या गाजावाजा करणाऱ्या योजनांच्या अपयशावर हा आंदोलनाचा थेट पुरावा आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन जलव्यवस्थापनाच्या दृष्टीने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. वडाळीच्या जलसमाधी आंदोलनाने बुलढाण्यातील झोपलेल्या प्रशासनाला खडबडून जागे करण्याचे काम केले आहे. हा संघर्ष केवळ पाण्याचा नाही, तर जगण्याचा लढा आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!