धुळेच्या शासकीय विश्रामगृहात एक मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी कोट्यवधींच्या रकमेचा खुलासा करत राजकीय हलचल निर्माण केली आहे.
धुळे जिल्ह्याच्या गुलमोहर शासकीय विश्रामगृहात राजकीय घडामोडींचा भडका उडाल्याचे चित्र समोर आले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी थेट आरोप केला आहे की, अंदाज समितीतील काही आमदारांना वशिला देण्यासाठी तब्बल कोट्यवधी रुपयांची रक्कम एका खोलीत ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे, ही रक्कम विविध शासकीय विभागांतील अधिकाऱ्यांकडून उचलली गेली आहे. ती खोली क्रमांक 102 मध्ये ठेवण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.
घडलेल्या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासन आणि राजकीय यंत्रणांवर गंभीर आरोपांची छाया पडली आहे. गोटे यांनी विश्रामगृहाच्या त्या खोलीला बाहेरून कुलूप लावून जिल्हाधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ती उघडण्याची मागणी केली होती. या मागणीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि राजकीय वातावरणात उष्णता वाढली.
विशिष्ट हेतू लपलेला
धुळे दौऱ्यावर आलेल्या अंदाज समितीतील सदस्यांना पैसे देण्यासाठीच ही रक्कम जमा करण्यात आली, असा आरोप माजी आमदार गोटे यांनी स्पष्टपणे केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोलीत काही कोटी रुपये आढळले आहे. यामागे विशिष्ट राजकीय हेतू लपलेला आहे. या प्रकारामुळे अंदाज समितीच्या अध्यक्षपदावर असलेल्या आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
Vijay Wadettiwar : खालून वरपर्यंत भेसळीची माळ, वीज घोटाळ्याचं मंत्रालयात मूळ
विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 हे सर्व घोटाळ्याचे केंद्रबिंदू ठरले आहे. ती खोली खोतकर यांच्या खासगी सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावे बुक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकाराचा ठपका शिंदे गटावर पडत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रशासनाची कुंठित भूमिका
घडलेल्या घटनेनंतर माजी आमदार गोटे यांनी जिल्हा प्रशासन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनात काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सरकारवर थेट टीका केली आहे. त्यांच्या मते, हा संपूर्ण प्रकार म्हणजेच खोक्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी आर्थिक खेळी खेळली जात असल्याचा आरोप त्यांनी स्पष्टपणे केला आहे. त्यांनी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.
राजकीय वादळ
सर्व प्रकारामुळे धुळे जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यभरात राजकीय खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे प्रकरण अधिकच गंभीर होत आहे. आता या सर्व आरोपांवर न्यायालयीन चौकशी होण्याची शक्यता वाढली आहे. प्रकरणात तथ्य असल्यास, पुढील काळात मोठे राजकीय चेहरे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भ्रष्टाचाराच्या सावलीखाली लोकशाही संस्थांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल किती निष्पक्ष आणि कठोर होतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
