निवडणुकीपूर्वी गोडगोड शब्दांनी शेतकऱ्यांच्या भावनांवर स्वार होणाऱ्या नेत्यांनी सत्तेत आल्यावर मात्र भाषाच बदलली आहे. सातबारा कोरा करू, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, अशी भाषणात घोषणा करणारे देवेंद्र फडणवीस आज सत्ता स्थापन केल्यानंतर आपल्या उपमुख्यमंत्र्यांमार्फत शेतकऱ्यांना 31 तारखेपूर्वी बँकेचे पैसे भरा असा दम देत आहेत. याच मुद्द्यावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी थेट फडणवीसांवर आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
अनिल देशमुख म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच्या प्रचारसभांमध्ये देवेंद्र फडणवीस मोठ्या थाटात सांगत होते, ‘आमचे सरकार आले की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, सातबारा कोरा करू’. पण आता तेच सरकार आणि त्याचे उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांना 31 तारखेपूर्वी बँकांचे कर्ज फेडा असे बजावत आहेत. सत्तेच्या खुर्चीत बसताच त्यांनी शेतकऱ्यांसोबत केलेले वचनच उघडपणे पायदळी तुडवलं आहे.
Operation Thunder : एमडी ड्रग्जच्या गर्तेतून नागपूरची सुटका सुरू
गंभीर आरोप
आज परिस्थिती जरी वेगळी वाटत असली तरी लोकसभा आणि विधानसभेतील निवडणुकांच्या वेळी जे काही घडलं, ते सामान्य लोक विसरले नाहीत, असं म्हणत देशमुखांनी EVM यंत्रणेबाबतही संशय व्यक्त केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर जे चित्र निर्माण झालं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत मतदार यादीतील फेरफार, ओळखपत्रांची गडबड आणि ईव्हीएमच्या माध्यमातून निकालांवर प्रभाव टाकला गेला. त्यामुळे हे सरकार खरंतर जनतेचे नाही, हे EVM सरकार आहे.
राजकारणाच्या या गढूळ पाण्यातही देशमुखांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिशा देणाऱ्या शरद पवारांच्या नेतृत्वाची आठवण सांगितली. पक्षफुटीच्या वेळी, ज्या दिवशी अनेक नेते बाहेर पडत होते, त्या दिवशी मी आणि काही सहकारी शरद पवार यांना भेटायला गेलो होतो. त्या दिवशी पवारसाहेब शांतपणे म्हणाले, ‘ज्यांना जायचंय त्यांनी जावं, मी नव्या तरुण पिढीसोबत पक्ष पुन्हा उभा करेन’. त्याच आत्मविश्वासाने आजही ते लढत आहेत, असं देशमुख म्हणाले.
Bacchu Kadu : जलसमाधीच्या रूपात प्रहार कार्यकर्त्यांचा विरोध
निष्ठा कायम
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, गेल्या 26 वर्षांपासून आम्ही पवार साहेबांच्या सहवासात काम करत आहोत. हे केवळ एक राजकीय प्रवास नाही, तर विश्वास आणि निष्ठेचा प्रवास आहे. आजच्या वर्धापन दिनी मी कोणतं भाषण देणार नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून माझी निष्ठा आणि शुभेच्छा कायम आहेत.
राजकारणात भाषणं गाजवली जातात, पण सत्तेवर आल्यानंतर कृतीच खरी ओळख ठरते. देशमुखांच्या आरोपांनी महायुती सरकारची दोन मुखवटे पुन्हा जनतेपुढे आणले आहेत. निवडणुकीपूर्वीचा ‘लोकप्रिय नेता’ आणि निवडणुकीनंतरचा ‘सत्तेचा शासक’. आता जनता हे विसरते का लक्षात ठेवते, हे येणाऱ्या निवडणुकींमध्येच कळेल.
