2017-18 मध्ये मोहपात झालेला सिटी सर्वे 99 टक्के चुकीचा ठरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. आता आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा सर्वे रद्द होऊन नव्याने, मोफत सिटी सर्वे होणार आहे.
‘तुमचं घर तुमचं हक्काचं’ हे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरायला सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून चुकीच्या सिटी सर्वेमुळे त्रस्त झालेल्या मोहपा शहरातील नागरिकांना आता दिलासा मिळणार आहे. 2017-18 मध्ये मोहपात झालेल्या सिटी सर्वेमध्ये 99 टक्के चुका झाल्याचे उघडकीस आले होते. या चुकीच्या मापनामुळे शेकडो नागरिकांच्या मालमत्तेवर मालकीचे प्रश्न निर्माण झाले होते. पण, या अन्यायाविरोधात लढा दिला आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आणि त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
सोमवार 16 जून रोजी नागपूर जिल्हा नियोजन भवनात झालेल्या विशेष बैठकीत महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत मोहपा नगर परिषदेचा 2017-18 मधील संपूर्ण सिटी सर्वे रद्द करण्यात आला, आणि नव्याने, शासकीय खर्चाने व नागरिकांना कोणतीही आर्थिक जबाबदारी न देता, नवीन सिटी सर्वे करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
प्रक्रिया, सनदही मोफत
या नव्या सिटी सर्वेसाठी लागणारा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती (DPDC) मार्फत केला जाणार आहे. नागरिकांना घराचा किंवा जमिनीचा पुरावा म्हणून मिळणाऱ्या सनदपत्रांसाठी देखील एक रुपयाही भरावा लागणार नाही. या निर्णयामुळे शेकडो वंशपरंपरागत जमिनींची विक्री, खरेदी व वारसा प्रक्रिया सुलभ होणार आहे.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना तिन दिवसांत कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले. यामध्ये संपूर्ण मोहपा शहराचे नवे मोजमाप, नवे नकाशे आणि मालकी सनद तयार केली जाणार आहे. या निर्णयामुळे प्रलंबित व्यवहारांना वेग येईल आणि कायदेशीर पेचातून नागरिकांना मुक्तता मिळेल.
Wardha : सत्ता सोडून प्रशासनाच्या खुर्चीत बसले किरीट सोमय्या
धडाका ठरला निर्णायक
या निर्णयामागे असलेला खरा चेहरा म्हणजे सावनेरचे आमदार डॉ. आशिष देशमुख. त्यांनी केवळ 2 जूनलाच महसूल मंत्र्यांना एक सविस्तर निवेदन सादर केले होते. त्यानंतर सलग पाठपुरावा करत त्यांनी हा विषय प्रशासनाच्या आणि मंत्र्यांच्या दरबारी वारंवार मांडला. त्यांच्या धडाडीच्या भूमिकेमुळेच अखेर हा अन्याय दूर होतो आहे.
मोहपा शहरातील नागरिकांमध्ये आता समाधानाचे वातावरण आहे. अनेकांनी देशमुख यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत खऱ्या अर्थाने आमदाराचं प्रतिनिधित्व काय असतं ते दाखवलं, असे म्हटले आहे. सिटी सर्वेच्या गोंधळामुळे नागरिकांना मोठ्या आर्थिक आणि भावनिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. पण आता एक नवी आशा निर्माण झाली आहे.
ही कारवाई केवळ मोहपासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श ठरू शकते, की नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी जर प्रतिनिधीने प्रामाणिकपणे पाठपुरावा केला, तर सरकारही निर्णय घेते. मोहपाच्या नव्या सिटी सर्वेचा निर्णय हा नागरिकांच्या विश्वासाचा विजय आहे, आणि लोकशाही प्रक्रियेतील एक सकारात्मक उदाहरण आहे.
