प्रतिबंधित बीटी कापूस बियाण्यांची अवैध वाहतूक थांबवत चंद्रपूर पोलिसांनी मोठा स्फोट टाळला आहे. 800 पॉकेट्ससह 13.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत दोन आरोपी जेरबंद करण्यात आले.
कृषीक्षेत्रातील निषिद्ध बीटी बियाण्यांच्या काळ्या बाजाराला चपराक देणारी मोठी आणि धक्कादायक कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात पार पडली. अन्नदाताच्या नशिबाशी खेळणाऱ्यांचा खेळ पोलीसांनीच संपवला. स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून 800 पॉकेट्स प्रतिबंधित बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहेत. एकूण मुद्देमालाची किंमत तब्बल 13 लाख 50 हजार इतकी आहे.
14 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे विसापूर–बल्लारपूर रस्त्यावर सापळा रचण्यात आला. टाटा एस (क्रमांक. MH 40 AB 2356) या वाहनाची तपासणी करताना त्यामध्ये प्रतिबंधित बीटी बियाण्याचे 800 पॉकेट्स आढळले. ‘पुष्पा 5’ नावाने संशोधित हायब्रीड कापूस बियाणे, या नावाने हे बियाणे अवैधरित्या वाहतूक केली जात होती. प्रत्येक पॉकेटची किंमत सुमारे एक हजार 500 इतकी आहे. एकूण बियाण्यांचा बाजारमूल्य 12 लाख इतका आहे. त्याचबरोबर वाहनसह अन्य मुद्देमालाचा एकत्रित अंदाजे किमतीचा आकडा 13.5 लाखावर पोहोचतो.
विविध कलमान्वये गुन्हा दाखल
अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींमध्ये इमरान खान नासीर खान (वय 37) रा. बगड खिडकी वार्ड, चंद्रपूर, सुमित नगराळे रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली (बियाण्याचा मालक) यांचा समावेश आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी कृषी विभागाची मदत घेतली. कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालावरून यातील बियाणे अवैध व प्रतिबंधित असल्याचे स्पष्ट झाले.
या आरोपींवर विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम 223, बीज अधिनियम 1966 अंतर्गत कलमे 14, 7(A), 7(C), 7(D), 19. बियाणे नियंत्रक आदेश 1983 द्वारे कलम 3, 8, 1. बियाणे नियम 1968 अंतर्गत कलम 8, 9, 10, 11, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत कलम 8, 15(1)(2), 16(1)(2), अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 द्वारे कलम 3(2)(D), 7, हा गुन्हा कृषी गुन्ह्यांच्या यादीत गंभीर स्वरूपाचा समजला जातो. त्यामुळे या दोन्ही आरोपींना शिक्षा होण्याची शक्यता अधिक आहे.
Ashish Deshmukh : आमदारांच्या आग्रहाने मोहपाची नव्याने नकाशा क्रांती
धडाकेबाज कारवाई
सदर कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रीना जनबंधु, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्याम गव्हाणे, तसेच सहायक पोलिस निरीक्षक दीपक कॉकेंडवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांना स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलीस स्टेशनच्या अंमलदारांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बीटी बियाण्यावर अनेकवेळा निर्बंध लादण्यात आले असूनही काही लालची व्यापारी अधिक नफा मिळवण्यासाठी कृषी कायद्यांचे उघडपणे उल्लंघन करतात. या बोगस बीटी बियाण्यामुळे शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक फटका बसतो, उत्पन्न घटते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि शेती अपयशी ठरते. ही कारवाई म्हणजे कृषी माफियांविरोधात पोलिसांची जोरदार तडाखेबाज चपराक आहे. यापुढेही अशा अवैध बियाणांच्या साखळ्या मोडण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
