महाराष्ट्र

Akola Airport : ‘वर्षा’तून अकोल्याच्या आकाशात नव्या वाऱ्यांची आशा

Devendra Fadnavis : विमानतळाचा नवीन अध्याय सुरू

Post View : 44

Author

वर्षानुवर्षं आश्वासनांच्या सावलीत रखडलेलं अकोल्याचं विमानतळ स्वप्न अखेर हालचालीत आलं आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विशेष बैठक होताच, विकासाच्या दिशेने नवा धावपट्टीवरचा टप्पा सुरू झाला आहे.

वर्षानुवर्षं राजकीय घोषणा, आश्वासनांची बरसात आणि प्रशासनाच्या ढिसाळ धोरणात अडकलेलं अकोला विमानतळाचं स्वप्न आता नव्या उंचीच्या दिशेनं झेपावण्याच्या तयारीत आहे. एकेकाळी संपूर्ण विदर्भाचं ‘हवाई दार’ बनण्याची क्षमता असलेल्या अकोल्यातील विमानतळाला आता ‘नवसंजीवनी’ मिळण्याची आशा पुन्हा निर्माण झाली आहे. ती देखील थेट राज्याच्या सत्ताकेंद्रातून, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान ‘वर्षा’ वरून.

अकोल्याचे खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुराव्याला अखेर मोठं यश मिळालं आहे. अकोला विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत विशेष बैठक घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश दिले. बैठकीत अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचीही उपस्थिती ठळक होती.

Ladki Bahin Yojana : देवाभाऊ बनणार महिलांचे बिझनेस कोच

दशकाचा आढावा

अकोला हे शैक्षणिक, कृषी आणि व्यापाराचं एक केंद्र असूनही इथल्या विमानतळाच्या विकासासाठी अनेक सरकारं आणि पक्षांनी आश्वासनांची फोडणी दिली. पण प्रत्यक्षात, हा प्रकल्प ‘फाईलांमध्ये बंद झालेलं स्वप्न’ बनून राहिला. अकोल्याच्या नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली, मागण्या लावून धरल्या, पण सरकारचा गियर पडलेलाच राहिला. नागपूर आणि औरंगाबादसारख्या शहरांच्या तुलनेत अकोला कायमच हवाई संपर्काच्या दृष्टीने उपेक्षित राहिलं. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत अकोला विमानतळाचा उल्लेख होऊनही प्रत्यक्ष विकासात त्याचा ठसा उमटला नाही.

नव्या धाग्यांची वीण

या रखडलेल्या स्वप्नाला आता राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळत आहे. नुकत्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत अकोला, कोल्हापूर, कराड, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या भूसंपादनाची सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प भूसंपादनाअभावी रखडता कामा नये. सर्व यंत्रणांनी वेळेत कार्य पूर्ण करावं. यात अकोला विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला विशेषत्वाने प्राधान्य देण्यात आलं असून लवकरात लवकर अडथळे दूर करून विकासकामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Eknath Shinde : बाळासाहेबांचे वारसदार की कॉंग्रेसचे ‘प्रेमवीर’?

ठिणगीपासून पेटलेली मशाल

धोत्रे यांनी केवळ संसदेत नव्हे, तर मंत्रालयातही अकोला विमानतळाचा आवाज सातत्याने पोहोचवला. त्यांच्या थेट संपर्कांमुळेच ही उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली, असे सूत्रांकडून कळते. धोत्रे यांनी ‘स्वतःची खासदारकी’ नव्हे, तर ‘जनतेचं हक्काचं स्वप्न’ म्हणून या प्रकल्पाला हात घातला आहे. आज अकोलाच्या भूमीवरुन पुन्हा एकदा हवाई सेवा सुरू होण्याची आशा धगधगू लागली आहे. एका दशकाच्या अंधाऱ्या प्रतीक्षेला आता सत्तेच्या झोतात प्रकाश मिळालाय. अकोल्याच्या तरुण पिढीला, व्यापाऱ्यांना, औद्योगिक गुंतवणूकदारांना आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. या साऱ्या घडामोडी अकोल्याला नव्या आशेच्या उंबरठ्यावर उभं करतात. सत्तेचा केंद्रबिंदू असलेल्या ‘वर्षा’ निवासावरून अकोल्याच्या आकाशात आशेचं एक नवीन विमान आता उड्डाणासाठी सज्ज होईल, अशी अपेक्षा आहे.

अभिजित कराळे | Abhijeet Karale

अभिजित कराळे | Abhijeet Karale

पत्रकारिता, बातम्या हा अभिजित यांच्या आवडीचा विषय. पत्रकारितेचा कोर्स केला नसला तरी त्यांनी न्यूज रिपोर्टिंगच्या आवडीतून त्यांनी आपलं लेखन कौशल्य विकसित केलं. ‘द लोकहित लाइव्ह’च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारितेतील आपला प्रवास सुरू केला. पुण्यातून त्यांनी संगणशास्त्र, वेब डेव्हलपमेंट, कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे शिक्षणही पूर्ण केले आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!