अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. आधीच मागास समजल्या जाणाऱ्या अकोल्यात विकासाच्या नावाखाली फक्त घोषणा करण्यात येतात. त्यातच आता निसर्गाचा कोप शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फिरवत आहे. दुर्दैव म्हणजे शासनाकडून या नुकसानाची दखल घेण्यात देखील दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
राज्य सरकारकडून 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी कोट्यवधींची मंजुरी दिली असली, तरी प्रत्यक्षात बहुतांश शेतकऱ्यांना आजही एक रुपयाही मिळालेला नाही. शासनाच्या ई-पंचनामा पोर्टलवर 56 हजार 748 शेतकऱ्यांची यादी अपलोड केली जाणार होती. मात्र अजूनही 11 हजार 748 शेतकऱ्यांची नावे अपलोड व्हायची आहेत. जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये 56 हजार 371 हेक्टरवर पीक नुकसान झाले असून 30 हेक्टर जमिनी खरडून गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या नुकसान भरपाईसाठी शासनाने 18 मार्च रोजी 79 कोटी 48 लाख रुपयांच्या मदतीसाठी मंजुरी दिली.
Shalartha Scam : एसआयटीच्या प्रमुख पदावरून सुनीता मेश्राम यांची सुट्टी
पेरणीसाठी नाही भांडवल
शेतकऱ्यांच्या खात्यांवर मात्र अद्याप काहीच जमा झालेले नाही. उलटपक्षी प्रशासन केवायसी, अंगठा, आधार प्रमाणीकरणाच्या नावाखाली वेळ काढत आहे. परिणामी खरीप हंगाम सुरू असूनही शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नाही. कर्जबाजारीपणाने पिचलेले शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहे. सरकारच्या निवडणुकीपूर्वी दिलेली कर्जमाफी अद्याप हवेतच विरलेली आहे. या पार्श्वभूमीवर रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाला चांगलाच खडसावले आहे.
नुकसानभरपाईची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. खोडके यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना अनेक शेतकरी आणि पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी अतिवृष्टीसंदर्भातील फाईल तपासली आणि आश्वासन दिले की, ज्या तालुक्यांमध्ये सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झाले, त्या काही शेतकऱ्यांना पैसे वितरित करण्यात आले आहेत.
Nana Patole : शिंदे साहेब महाराष्ट्राशी गद्दारीची किंमत कधी मोजणार
उर्वरित ऑक्टोबर 2024 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेली रक्कम तातडीने त्यांच्या खात्यावर जमा केली जाईल. मात्र शेतकऱ्यांना प्रशासनाच्या शब्दांवर विश्वास ठेवायचा की नाही, हा खरा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा दिलेली आश्वासने केवळ कागदांवरच राहिली आहेत. आता खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. वेळ न दवडता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले पाहिजेत. अन्यथा रयत शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार, हे प्रशासनाने लक्षात घ्यावे असा इशाराही देण्यात आला आहे.
