
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांनी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आणि आक्रमक शब्दांत टीका केली आहे. एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राजकीय क्षेत्रात सध्या एक संतप्त आवाज वाऱ्यासारखा पसरत आहे. तो आवाज आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पौळ यांचा. एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमध्ये अयोध्या पौळ यांनी थेट शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर तोंडसुख घेत, असल्या माणसाला चपलेने बडवले पाहिजे, अशी आक्रमक भाषा वापरल्याचे स्पष्ट ऐकू येते.
संजय राठोड यांच्या एका कार्यकर्त्याशी फोनवर बोलताना अयोध्या पौळ यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. पोस्टवरून सुरू झालेला वाद, राजकीय मर्यादांच्या पुढे जाऊन वैयक्तिक टोकाला पोहोचला. सध्या ही क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. तसेच ठाकरे गटाच्या ठाम भूमिकेचा एक मोठा नमुना म्हणून पाहिली जात आहे.

संभाषणाने वाढवले तापमान
क्लिपमध्ये अयोध्या पौळ यांना एका कार्यकर्त्याचा कॉल येतो. कार्यकर्त्याने संजय राठोड यांच्या नावाचा संदर्भ देत काही विचारणा केली असता, अयोध्या पौळ भडकल्या. त्यांनी सांगितले की, पोस्टमध्ये राठोड यांचे नाव नाही. पण अनैतिक संबंध ठेवणाऱ्यांबद्दल लिहिले आहे. अशा माणसांना चपलेने बडवले पाहिजे. अयोध्या यांचा रोष केवळ त्या कार्यकर्त्यापर्यंत मर्यादित राहिला नाही. त्यांनी थेट संजय राठोड यांच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करत, त्यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांचा उल्लेख करत, त्या आरोपांवर आधारित टीका केली.
वादाच्या मुळाशी अयोध्या पौळ यांनी रविवारी केलेली एक फेसबुक पोस्ट आहे. त्यामध्ये त्यांनी संजय राठोड यांचा एक वारकरी वेशातील फोटो शेअर करत लिहिले की, अनैतिक संबंध ठेऊन निष्पाप जीवाचा गर्भपात करून एका तरुणीच्या मृत्यूला कारणीभूत असणारे नीच, हरामखोर लोक वारकरी असल्याचे दाखवतात. हे वारकरी संप्रदायाचा अपमान आहे, अशा लोकांचा जाहीर निषेध करतो. ही पोस्ट पाहून संतप्त झालेल्या राठोड समर्थकाने थेट अयोध्या पौळ यांच्याशी संपर्क साधला, पण त्याचा परिणाम त्याच्यावरच उलटा झाला. कारण पौळ यांनी रोषाने उत्तर देत संजय राठोड यांना सार्वजनिकरित्या शिक्षा व्हावी अशी भूमिका घेतली.
Nagpur : हिंसाचार प्रकरणी कोर्टाचा निर्णय; आरोपींना जामीन मंजूर
संतुलन ढासळण्याची चिन्हे
घडलेल्या वादामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील कटुता अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अयोध्या पौळ यांचा थेट प्रहार म्हणजे केवळ भाषिक आक्रमकता नव्हे, तर एक राजकीय रणनीतीही आहे, असे जाणकार सांगतात. ठाकरे गट सध्या विविध माध्यमांतून आपल्या आक्रमक भूमिका मांडत आहे. ही क्लिप त्या मोर्चातीलच एक भाग असल्याचे चित्र उभे राहते.
घडलेल्या प्रकरणामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक अयोध्या पौळ यांचे समर्थन करत आहेत. काहींनी त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतला आहे. मात्र, यामुळे संजय राठोड पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यांच्यावर पूर्वी झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही क्लिप आणि पोस्ट जनमानसात जुने विषय पुन्हा उकरून काढत आहेत.
Shiv Sena Akola : काका अकोल्यातील पुतण्यांना कोणता मंत्र देणार
राजकीय टोकाच्या या संभाषणाने संजय राठोड यांच्यावरील जुन्या वादांना पुन्हा उजाळा दिला आहे. अयोध्या पौळ यांनी वापरलेली भाषा आणि त्यामागचा उद्देश हा त्यांच्या पक्षाच्या विचारधारेचा एक आक्रमक भाग आहे. यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.