
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईतील भव्य कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा करण्यात आली.
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले नाव अखेर अधिकृत झाले आहे. अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मुंबईत वरळी डोम येथे झालेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत या नियुक्तीची औपचारिक घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आशिष शेलार, विनोद तावडे आणि राज्यातील भाजपचे सर्व आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर भाजपच्या संघटनात्मक पातळीवर नवसंजीवनी निर्माण झाली आहे. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला कोकण आणि इतर भागांमध्ये नव्या जोमाने विस्तार करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, प्रदेशाध्यक्षपदाचे आश्वासन पूर्ण करत भाजपने नाराज असलेल्या रवींद्र चव्हाण यांना मानाचा बहुमान दिला आहे.

Nagpur : आरबीआयच्या आक्षेपामुळे महापालिका निवृत्ती वेतन संकटात
संघटनेचा पाया
रवींद्र चव्हाण यांनी युवा मोर्चातून राजकारणात प्रवेश करत कल्याण-डोंबिवली महापालिकेपासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, चार वेळा आमदार, मंत्री आणि कार्याध्यक्ष अशी सातत्याने वाढत गेलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून त्यांनी राजकीय संस्कार घेतले असून, पक्षनिष्ठेच्या वाटेवरून त्यांच्या नेतृत्वाची आज महाराष्ट्रभर पोच आहे.
2009 साली डोंबिवली मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करणारे रवींद्र चव्हाण, अलीकडच्या निवडणुकीत 50 हजारांहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारमध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे.
Shalartha ID Scam : शिक्षणाच्या मंदिरात भ्रष्टाचाराचा भस्मासूर
आगामी निवडणुकीची जबाबदारी
चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऑगस्ट 2022 मध्ये प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने मजबूत संघटन रचना उभारली. त्यांच्या कार्यकाळात 1.5 कोटी नवीन प्राथमिक सदस्य जोडले गेले, 5 लाख सक्रिय कार्यकर्ते निर्माण झाले. बूथस्तरापासून जिल्ह्यापर्यंत संघटनात्मक निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतरही बावनकुळे यांनी प्रदेशात बूथस्तरीय व्यवस्थापन अधिक बळकट करून विधानसभा निवडणुकीत पक्षाला 132 जागा जिंकून दिल्या. त्यांनी दिलेले हे भक्कम पायाभूत काम आता चव्हाण यांच्या पुढील वाटचालीला अधिक स्थैर्य देणारे ठरणार आहे.
नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्यासमोर मोठी जबाबदारी आहे. राज्यात मुंबई महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका अशा अनेक महत्त्वाच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांमध्ये भाजपने आपले वर्चस्व अधिक बळकट करावे, यासाठी चव्हाण यांना संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांच्या बळावर भर घालावा लागणार आहे. भाजपमधील अंतर्गत नाराजी, कार्यकर्त्यांचा समन्वय, मतदारांशी थेट संपर्क, नवमतदारांपर्यंत पक्षाची पोहोच आणि राज्यातील विविध भागांतील स्थानिक मुद्द्यांवर पक्षाची पकड याबाबत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी होणार आहे.
2002 मध्ये कल्याण उपजिल्हाध्यक्षपदापासून रवींद्र चव्हाण यांची भाजपमधील वाटचाल सुरू झाली होती. 2005 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत महापालिकेत प्रवेश मिळवला. त्यानंतर स्थायी समिती सभापती झाले. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा प्रत्येक टप्पा भाजपच्या कार्यपद्धतीशी निष्ठा ठेवत पार पडलेला आहे. आज ते भाजपचे बारावे प्रदेशाध्यक्ष म्हणून सूत्रे स्विकारत असले तरी आशिष शेलार यांच्या भाषेत ते विरोधकांचे ‘राजकीय तेरावे’ ठरण्याची शक्यता आहे. आगामी काळात त्यांच्याकडून संघटनात्मक पुनर्रचना आणि निवडणुकीतील विजयाचे नेतृत्व अशीच अपेक्षा ठेवली जात आहे.