
एकेकाळी ऑटो रिक्षाचं स्टेयरिंग सांभाळणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना आता महाराष्ट्र भाजपाच्या संघटनेचं स्टेयरिंग मिळालं आहे. भाजपाने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करत कार्यकर्त्यांच्या पक्षाची ओळख पुन्हा अधोरेखित केली आहे.
एकेकाळी डोंबिवलीच्या रस्त्यांवर ऑटो रिक्षाच्या स्टेयरिंगवर विश्वासाने हात ठेवणारा कार्यकर्ता, आज महाराष्ट्र भाजपाच्या संघटनाचा किल्लेदार बनला आहे. कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंतचा प्रवास म्हणजे केवळ पदाची गोष्ट नाही. ती आहे संस्कृतीची, विचारांची आणि एका पक्षाच्या मूलभूत मूल्यांची आणि याचे जिवंत उदाहरण म्हणजे रवींद्र चव्हाण. महाराष्ट्र भाजपाने मोठा संघटनात्मक निर्णय घेत, मंत्री आणि पक्षातील खंदे नेते रवींद्र चव्हाण यांची भाजपाचे बारावे प्रदेशाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा केली. त्यांच्या निवडीचा क्षण म्हणजे भाजपाच्या ‘कार्यकर्ता ते शिखर’ या प्रवाहाचे प्रातिनिधिक चित्रच जणू.
गडकरींनी उलगडली एक प्रेरणादायक कथा… मुंबईत पार पडलेल्या प्रदेशाध्यक्ष निवडीच्या सोहळ्यात, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख करत भावुक आठवणींना उजाळा दिला. गडकरी म्हणाले, मी 2009 मध्ये प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हा डोंबिवली मतदारसंघासाठी खूपच चर्चित निर्णय घेतला होता. तेव्हा मला विश्वास होता की, हा कार्यकर्ता भविष्यात मोठा नेता ठरणार आणि आज तो विश्वास सत्यात उतरल्याचं समाधान आहे, असं सांगत गडकरींनी चव्हाण यांचा गौरव केला.

Nagour : देवाभाऊंच्या शहरात आता सिंहाची गर्जना अन् झेब्राची धाव
भाजप संस्कृती
गडकरी पुढे म्हणाले की, मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा डोंबिवलीला गेलो, तेव्हा रवींद्र चव्हाण हे ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते. त्यांनी माझ्यासोबत भव्य यात्रा काढली होती. योगायोग म्हणजे, जेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने आणलं, तेव्हा तेही ऑटो रिक्षा चालक होते. आता महाराष्ट्र भाजपाचं आणि ऑटो रिक्षांचं काही विशेष नातं आहे की काय, ते मला माहिती नाही. त्यांच्या या मिश्किल टिपणीवर संपूर्ण सभागृहात हास्याचा फवारा उसळला.
गडकरी म्हणाले, ही कुठल्याही पक्षात शक्य न होणारी गोष्ट फक्त भाजपातच शक्य आहे. एखादा कार्यकर्ता झिरोवरून सुरूवात करून प्रदेशाध्यक्षाच्या खुर्चीवर पोहोचू शकतो, हीच भाजपाची खरी ओळख आहे. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की भाजप ही ‘नेत्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची पार्टी’ आहे. प्रत्येक मेहनती, जिद्दी आणि तळमळीच्या कार्यकर्त्याला इथे संधी आहे. हीच संस्कृती पक्षाला मजबूत करत असते.
Nagpur : आरबीआयच्या आक्षेपामुळे महापालिका निवृत्ती वेतन संकटात
कार्यकर्त्यांचा आवाज, संघटनेचा शिल्पकार
रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास हा केवळ पदांमधून नव्हे, तर कामगिरीमधून घडलेला आहे. डोंबिवली परिसरातील जनतेचा आधारस्तंभ, शहर विकासासाठी सातत्याने झटणारा नेता, आणि आता संपूर्ण महाराष्ट्र भाजपाचा नवा चेहरा. त्यांच्या नेतृत्वात पक्षाची संघटना आणखी व्यापक होईल, नव्या कार्यकर्त्यांना दिशा मिळेल, आणि भाजपाच्या मूल्यांचा प्रसार अधिक गतीने होईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे आगामी काळात भाजपाच्या संघटनात्मक गतीला नवे बळ मिळेल, हे निश्चित. विशेषतः शहरी भागातील संघटन बळकट करण्यासाठी चव्हाण यांचा अनुभव आणि शैली उपयुक्त ठरेल, अशी पक्षात अपेक्षा आहे. एक पायरी मागे पाहिली, तर लक्षात येतं की, एका ऑटो रिक्षाच्या सायलेन्सरखालूनच भविष्याचं इंजिन फडफडत होतं. आज ते इंजिन पूर्ण पक्षाला गती देण्यास सज्ज आहे.