
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात मराठी अस्मितेवर गदा आणणाऱ्या निर्णयामुळे वातावरण तापलेलं आहे. पण 5 जुलैला होणारी विजय दिन रॅली एक नवा स्फोट घडवेल का, हे पाहणं कुतूहलाचं ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात एका वादग्रस्त निर्णयावरून प्रचंड राजकीय वादळ उठले होते. तो म्हणजे राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीबाबतचा सरकारचा निर्णय. मराठी अस्मितेच्या मुळावर घाव घालणारा हा जीआर, केवळ भाषेचा मुद्दा नसून, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवरच झालेला आघात मानला गेला. त्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन मोठ्या नेत्यांनी या प्रश्नावर एकत्र येत मराठीच्या रक्षणासाठी एक नवा एल्गार पुकारला.
मराठी विजय दिन रॅलीच्या रूपाने 5 जुलै रोजी हा एल्गार जनतेसमोर येणार आहे. याआधी जीआर मागे घेण्यात आला असला तरी ठाकरे बंधूंनी ठरवलेल्या रॅलीला विजय दिनाचा नवा चेहरा दिला आहे. हा निर्णय केवळ आनंद व्यक्त करण्यापुरता मर्यादित नाही, तर पुढेही मराठी भाषेच्या संरक्षणासाठी दृढ संकल्प व्यक्त करणारा आहे.

डोममध्ये भव्य तयारी
मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये या रॅलीची जोरदार तयारी सुरू आहे. सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते आणि मराठीप्रेमी दाखल होणार आहेत. मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्यासह उद्धव गटाचे अनिल परब यांनी सभास्थळाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे.
जवळपास दोन दशकांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येत असल्याने राज्याच्या राजकारणात नवसंजीवनीचे संकेत मिळत आहेत. रॅलीला मराठी भाषा व संस्कृतीसाठी कार्य करणाऱ्या अनेक सामाजिक संघटना देखील उपस्थित राहणार आहेत. विरोधी पक्षांतील काही नेत्यांचा सहभाग होण्याची शक्यता आहे. तथापि, अद्याप पोलिसांनी या मेळाव्याला परवानगी दिलेली नाही.
Sajid Khan Pathan : आश्वासने अपूर्ण; सभागृहाची प्रतिमा मलीन?
दुटप्पीपणावर टोला
या मराठी विजय रॅलीवर केंद्रीय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी विजय रॅली न काढता पश्चात्ताप रॅली काढावी, असं खवखवित वक्तव्य करत त्यांनी इतिहास उजळला. मिश्रा समितीने हिंदी सक्तीचा प्रस्ताव आणला होता. त्यावेळी राज्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनीच तो स्वीकारला. आता त्याच गोष्टीवर विरोध कसा करता येतो? असा रोखठोक सवाल करत त्यांनी ठाकरे गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला.
जाधव यांच्या मते, आज जे लोक हिंदीला विरोध करत आहेत, त्यांनीच कधी काळी तीच भूमिका स्वीकारली होती. त्यामुळे त्यांनी विजय साजरा करण्याऐवजी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असाही टोला त्यांनी लगावला. त्यांचे हा वक्तव्य सत्ताधारी महायुती गटाच्या राजकीय रणनीतीचा एक भाग असल्याचंही जाणकार सांगतात.
नवा राजकीय अध्याय
राजकीय समीकरणे जसजशी बदलत आहेत, तसतशी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्षात नवा उमेदीचा श्वास निर्माण झाला आहे. फडणवीस सरकारने त्रिभाषा धोरणासंबंधीचा आदेश मागे घेतल्यानंतर जनतेमध्ये समाधान व्यक्त होत असतानाच, ही विजय दिन रॅली एक प्रकारे जनभावनेचे प्रतिबिंब ठरणार आहे.
5 जुलै रोजी मराठीचा विजय साजरा होईल का, की हा केवळ राजकीय स्टंट ठरेल? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की, मराठी अस्मिता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आली आहे.