
राज्यात मराठी-हिंदी भाषेच्या वादातून सुरू झालेला ठाकरे बंधूंचा आक्रमक मोर्चा हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर मराठी विजय सोहळ्यात रूपांतरित झाला आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठी आणि हिंदी भाषेचा वाद हा केवळ भाषिक अस्मितेपुरता मर्यादित न राहता राजकीय रणधुमाळीचा केंद्रबिंदू ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील एका जीआरपासून सुरू झालेल्या या वादाने आता थेट विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उडी घेतली आहे. 29 जून रोजी राज्य सरकारने हिंदी सक्तीचा वादग्रस्त जीआर रद्द करत मोठा निर्णय घेतला. त्यामुळे 5 जुलै रोजी मुंबईत नियोजित असलेला मनसे आणि ठाकरे गटाचा आक्रमक मोर्चा आता ‘मराठी विजय सोहळा’मध्ये रूपांतरित झाला आहे.
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, मराठी माणसाची ताकद पाहूनच सरकारने माघार घेतली आहे. हा मराठी एकजुटीचा विजय आहे. भाजपने मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले, पण तो प्रयत्न फसला. त्यांनी पुढे सांगितले की राज ठाकरे यांच्याशी संवाद सुरू असून 5 जुलैचा कार्यक्रम आता जल्लोष सभेच्या रूपात साजरा केला जाणार आहे.दरम्यान, विधान परिषदेत भाजप नेते माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी या विषयावर एक कविता सादर करून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या कवितेने विरोधकांना मिरची लागल्याचे दिसून आले.

मराठी रक्षणाची गरज
डॉ. फुके यांनी आपल्या कवितेत परखड भाषेत विचार मांडले. ते म्हणाले ‘घरात आईला म्हणणार मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही, कॉन्व्हेंट मध्ये घेणार शिक्षण, मराठीचे करणार रक्षण. सुट्टी साठी आहे युरोप, दुसऱ्यांवर करणार आरोप. सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्र आलो, लाथाळलेल्या जनतेने काय करतील कोण जाणे. हिंदुत्वाचे कधी दुकान, कधी प्यारा टिपू सुलतान. कास मराठीची धरली, निवडणुकीत केम छो वरली. धारावीत दाखवली रुबाब, लुंगी बहादूर छोटे नवाब. भारतभर भाराभार चिंध्या एक ना धड अस्तित्वाची धडपड. बुडाखालून गेल्या खुर्च्या, म्हणून मराठीचा मोर्चा. मोडीत कधीच निघाला ब्रँड, चाहू बाजूने वाजला बँड.’ डॉ. फुके यांच्या या कवितेने विरोधकांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत.
डॉ. फुके यांच्या कविता ओळींतून त्यांनी समाजातील आणि राजकारणातील दुहेरी भूमिकांवर खरमरीत टोला लगावला आहे. सत्तेसाठी वेगळे होणे आणि सत्तेसाठीच पुन्हा एकत्र येणे. हिंदुत्वाच्या चेहऱ्याआड ‘टिपू सुलतान’ किंवा ‘कधी दुकान, कधी ब्रँड’ चालवणाऱ्या नेतृत्वांची खिल्ली त्यांनी याच कवितेतून उडवली. डॉ. फुके यांनी भाषिक अस्मितेच्या नावावर मोर्चा काढणाऱ्यांवर शेलके शब्दात टीका करत म्हटले, ‘जर फडणवीसांनी हा जीआर रद्द केला, तर त्या विरोधी पक्षांनी त्यांचे आभार मानायला हवेत. ती सभा ‘विजय सोहळा’ न राहता ‘मुख्यमंत्र्यांची आभार सभा’ व्हायला हवी, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, भाषेवरून राजकारण खेळण्यापेक्षा भाषेच्या रक्षणासाठी कृती अधिक गरजेची आहे. मराठी शाळा बंद पडत असताना, मराठी माणसांच्या मुलांचे इंग्रजी माध्यमात शिक्षण, हे खरे दु:खद चित्र आहे. यावर कोणी बोलायला तयार नाही.
Sudhir Mungantiwar : पोंभूर्णाच्या मातीत आता ‘मेक इन चंद्रपूर’