
वर्षा निवासस्थानी स्नेहभोजनाच्या निमित्ताने आमदारांच्या ताटात स्नेह होता, पण शब्दांत शिस्तीचा झणझणीत डोस होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीर आमदारांना आणि ‘कॉन्ट्रॅक्टप्रिय’ लोकप्रतिनिधींना दिला थेट आणि ठाम इशारा.
राजकारणाच्या रंगमंचावर संवादाचे सूर कधी वाजतात, तर कधी संयमाचे डमरूही घुमायला लागतात! हेच दृश्य पाहायला मिळाले मुंबईच्या वर्षा बंगल्यावर, जेव्हा स्नेहभोजनाच्या गोडसर निमित्ताने खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील काही वाचाळ आणि ‘कंत्राट-प्रिय’ आमदारांचे कान चांगलेच उपटले. राजकीय गोडीगुलाबीसह दिलेला हा ‘कडक संदेश’ म्हणजे आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिस्तीची पुनःस्थापना करण्याचाच एक भाग होता.
वर्षा निवासस्थानी पार पडलेल्या स्नेहभोजनाच्या वेळी, देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील आमदार, मंत्री यांना थेट आणि ठाम इशारा दिला. कोणत्याही सरकारी कंत्राटाच्या मागे लागू नका. मतदारसंघाच्या हिताचा विचार करून विकासकामे करा. भाजपचे संस्कार हे शिस्तबद्ध आणि नैतिक राजकारणाचे आहेत, असं ते म्हणाले. त्यांनी स्पष्ट केलं की, विरोधकांच्या हाती मुद्दा देणारी कोणतीही वक्तव्ये करू नका. फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांना संधी देण्याऐवजी, आपणच सरकारच्या बाजूने सकारात्मक नॅरेटिव्ह उभं करा.

Pravin Datke : भूक शमवायला ऑर्डर केला ‘टिफिन’ आला मात्र ‘टकीला’
वक्तव्यांवर सज्जड दम
गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील काही आमदारांच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे पक्षाची आणि सरकारची डोकेदुखी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की, कोणतंही वादग्रस्त वक्तव्य महायुतीतील अंतर्गत वादाला चिथावणी देऊ शकतं. अशा गोष्टी अधिवेशनात विरोधकांच्या हातात आयते शस्त्र देतात, हे लक्षात ठेवा. या स्नेहभोजनात केवळ गोड बोलणं नव्हतं, तर शिस्तीचा गंभीर सूर होता. ‘आता पुरे झाले,’ असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
या स्नेहभोजनाचाच एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे महामंडळांतील पदवाटपाचा अंतिम फॉर्म्युला. महायुतीत भाजपच्या खात्यात 48 टक्के पदे, शिंदे गटाच्या वाट्याला 29 टक्के, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 23 टक्के पदांची सोय करण्यात आली आहे. या फॉर्म्युल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी एकसंध आणि स्पष्ट आघाडी तयार होत आहे, पण याच वेळी पक्षांतर्गत शिस्त आणि बेताल वक्तव्यांवर नियंत्रण हे यशासाठी महत्त्वाचं ठरणार आहे, याची जाण फडणवीसांनी महायुतीला करून दिली आहे.
शिस्त आवश्यक
स्नेहभोजनाच्या निमित्ताने वातावरण ‘अनौपचारिक’ असलं, तरी दिलेला संदेश ‘अत्यंत औपचारिक’ होता. राजकारणात मैत्री आणि मिश्कीलपणा चालतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाची आहे शिस्त आणि पक्षनिष्ठा. उपमुख्यमंत्र्यांचा आजचा ‘कानपिळणी कार्यक्रम’ म्हणजे एकप्रकारे पावसाळी अधिवेशनातील संभाव्य वादांना बंदिस्त करण्याची रणनीती होती.