
‘जय गुजरात’ घोषणेवरून टीकेच्या केंद्रात आलेल्या शिंदेंच्या बचावासाठी फडणवीस मैदानात उतरले. ‘प्रेम कमी होत नाही, विचार संकुचित होतो,’ असा सडेतोड प्रतिसाद दिला.
पुण्यातल्या एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’चा नारा दिल्यापासून राज्यात राजकीय वादळ उठलं. टीकेच्या झंझावातात सापडलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं समर्थन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या भूमिकेवर खरमरीत शब्दांत टीका केली आणि भाषेवरून झगडणं म्हणजे मराठी माणसाच्या व्यापकतेला धोका, असा इशारा दिला.
पुण्यात पार पडलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा केली. त्या घोषणेनंतर सोशल मीडियावर आणि विरोधी पक्षांमध्ये एकच गदारोळ उसळला. एकनाथ शिंदे यांच्यावर महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतल्याचे आरोप करण्यात आले. पण या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय मॅच्युरिटीचं उदाहरण देत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जय गुजरात म्हटलं म्हणजे महाराष्ट्रावरचं प्रेम संपलं, असं कोणी म्हणत असेल तर त्यांच्या विचारांची खोली उथळ आहे.

शरद पवारांच्या घोषणेची आठवण
फडणवीस म्हणाले, आज ज्या लोकांना ‘जय गुजरात’चा त्रास होतोय, त्यांनी आधी आपल्या नेत्यांकडे पाहावं. शरद पवारांनीही कर्नाटकात ‘जय कर्नाटक’ म्हटलं होतं. मग त्यावेळी कुठं गेलं होतं हे मराठी प्रेम? कोणत्याही समाजाच्या कार्यक्रमात तिथल्या संस्कृतीचा सन्मान करत जयकारा देणं ही आपली उदात्तता आहे, लाचारी नाही. मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं की, मराठी माणूस कधीच संकुचित विचार करत नाही. अटकेपार झेंडा रोवणाऱ्या मराठी माणसाची क्षमता सीमित नाही. भारत स्वतंत्र झाला, तेव्हा दिल्लीवर मराठी भगवा लहरत होता, हे विसरून चालणार नाही. भाषेचा आग्रह असावा, पण त्यातून विघातक दुराग्रह नको.
Yavatmal Municipal Council : हायमास्ट प्रकल्पात भ्रष्टाचाराचा हाय व्होल्टेज शॉक
प्रेम असावं, दडपण नको
आपण एका देशात राहतो, बाजूचं राज्य पाकिस्तान नाही, असं ठामपणे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मी उद्या तामिळनाडूत गेलो, तर मला तिथली भाषा शिकण्यावर प्रेम असेल. पण कोणी जबरदस्ती करणार असेल, तर ती मानसिक गुलामगिरी होईल. मराठीचा अभिमान असूनही दुसऱ्याच्या संस्कृतीला मान देणं, ही आपली परंपरा आहे. फडणवीसांनी भाषेच्या मुद्यावरून हातघाईवर उतरलेल्या कार्यकर्त्यांनाही फटकारलं. मराठीच्या प्रेमात गुंडशाही करता येणार नाही. महाराष्ट्रात मराठी माणसे इतर राज्यांमध्ये व्यवसाय करतात. तिथे त्यांना स्थानिक भाषा येत नाही म्हणून मारहाण होते का? इथेही अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. अशा गुंडगिरीवर आम्ही कठोर कारवाई करू.
मराठी हिताला प्राधान्य
भाषा, शिक्षण आणि प्रशासन यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, मराठी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच राज्य सरकार निर्णय घेणार आहे. आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. समिती अहवाल देईल आणि त्यातून योग्य निर्णय घेतला जाईल. फडणवीसांनी विरोधकांवर शेवटी खरमरीत टीका करत म्हटलं, विरोधकांकडे आता मुद्देच उरलेले नाहीत. जनतेच्या भावना, गरजा, चिंता यांच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही. म्हणूनच ते असे मुद्दे उचलतात, जे सामान्य जनतेच्या मनाला भिडतच नाहीत