नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात बांधण्यात आलेला उड्डाणपूल पावसामुळे उद्घाटनाआधीच खचला आहे. या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागपूर जिल्ह्यातील विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि सुरक्षिततेचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघातील एक उड्डाणपूल उद्घाटनाआधीच खचल्यामुळे खळबळ उडाली आहे. कामठी ते न्यू कामठी मार्गावरील हा पूल नुकत्याच झालेल्या पावसामुळे खचला आहे. पुलाच्या पृष्ठभागावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
हा उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून, तो अद्याप वाहतुकीस खुला करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला आहे. मात्र, नागरिकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेग आला आहे. व्हिडीओमध्ये पुलाचा काही भाग खोलवर बसलेला स्पष्ट दिसत आहे. या घटनेमुळे निर्माणाधीन विकासकामांच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Nana Patole : विदर्भाचे दुःख मुख्यमंत्र्यांनी दरबारात ऐकवलंच पाहिजे
सार्वजनिक पैशांचा अपव्यय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृहजिल्हा असलेल्या नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. उड्डाणपूल, रेल्वे भुयारी मार्ग, सिमेंट काँक्रीट रस्ते अशा विकासकामांची घोषणा मोठ्या थाटात करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात या कामांचा दर्जा अपेक्षित स्तरापेक्षा फारच घसरलेला दिसून येतो. कामठी परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर पावसात जे प्रकार घडले, त्यावरून बांधकामातील हलगर्जीपणा स्पष्ट होतो. उद्घाटनाआधीच पुलावर खड्डे पडणे आणि त्याचा काही भाग खचणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. ही घटना घडल्यावर संबंधित कंत्राटदाराची कार्यपद्धती, निगराणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे भान आणि सार्वजनिक निधीच्या वापराबाबतची शिस्त याबद्दल संशय निर्माण झाला आहे.
घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सार्वजनिक पैशातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पात गुणवत्ता राखली जात नसल्याचा आरोप होत असून, हे केवळ आर्थिक अपव्यय नाही, तर जनतेच्या सुरक्षिततेशी खिलवाड असल्याचे नागरिकांचे मत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूल खचल्याने येणाऱ्या काळात या भागात मोठ्या आपत्तींची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय, हा पूल वाहतुकीस खुला झाला असता, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता होती. सुदैवाने उद्घाटनाआधीच ही घटना समोर आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, त्यामुळे संबंधित यंत्रणांची निष्काळजी वृत्ती आणि बांधकामातील दर्जाची गंभीर समस्या स्पष्ट झाली आहे.
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात पहिल्यांदाच विजेच्या दरात घट
स्ट्रक्चरल ऑडिट
घडलेल्या घटनेनंतर स्थानिक पातळीवर शासनाकडे कठोर कारवाईची मागणी होत आहे. संबंधित उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे, दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सुरू झाली आहे. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशीही भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, विकासाच्या गोंडस घोषणांपेक्षा कामाचा दर्जा अधिक महत्त्वाचा आहे. पायाभूत सुविधा उभारताना पारदर्शक प्रक्रिया, दर्जेदार सामग्री आणि तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. नागपूरसारख्या शहरात जिथे देशाचे नेते राहतात, तिथे असे प्रकार घडतात याचे आश्चर्य वाटते. त्यामुळे अशा घटनांपासून धडा घेऊन भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी कठोर धोरणे राबविण्याची गरज आहे.