राज्यात शालार्थ घोटाळ्यात अनेक बनावट शिक्षकांची नियुक्ती उघडकीस आली आहे. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी यावर रोखठोक वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात शालार्थ घोटाळ्याने शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. 2019 ते 2025 सहा वर्षांत राज्यभरातील शाळांमध्ये 1 हजार 56 बनावट शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे शिक्षक फसव्या कागदपत्रांच्या आधारावर शाळांमध्ये रुजू झाले असून त्यांच्या वेतनातून ‘कमिशन’ कापण्याचा घनघोर भ्रष्टाचार सुरू होता. या प्रकरणामुळे राज्य सरकारच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या योजनेवरच मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घोटाळ्याचा अभ्यास करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेवर ठसठशीत भाष्य केले आहे.
विदर्भात सुरू असलेल्या बनावट शिक्षक भरती प्रकरणावर अप्रत्यक्षपणे त्यांनी बोट ठेवून या समस्येची गांभीर्य जाणवून दिली. नितीन गडकरी म्हणाले, शिक्षकांच्या नियुक्ती आणि मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतात, हे सर्वांना माहीत आहे. शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही की शिक्षण संस्था ‘चलता है’ अशी मानसिकता बाळगून काम करतील. त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांवरही टोला लगावला, शिक्षण अधिकारी शाळेत येतात. परंतु त्यांच्या कामाचा काहीच फायदा होत नाही. नंतर त्यांना तुरुंगातही पाठवावे लागते. नागपूर आणि विदर्भात सध्या घातक बनावट शिक्षक भरतीचा प्रकरण जोर धरले आहे. गडकरी यांच्या वक्तव्यातून या घोटाळ्याकडे लक्ष वेधले गेले आहे.
Sanjay Gaikwad : कॅन्टीनच्या वरण भातानंतर, आता कढी-भाताचा राडा
संस्थांनी नैतिकतेने चालावे
गडकरी यांनी गुणवत्तेच्या गरजेवर जोर देत म्हटले, चांगली संस्था होण्यासाठी चांगले शिक्षक, इमारत आणि विद्यार्थी असणे आवश्यक आहे. पण खरी गुणवत्ता तर तेव्हाच दिसते जेव्हा त्या संस्थेतून शिकलेले विद्यार्थी स्वतःचा एक अनोखा आणि सफल विश्व निर्माण करतात. त्यांनी आपल्या पत्नीच्या शिक्षण संस्थेचा उदाहरण देत सांगितले की शिक्षक नियुक्तीसाठी त्यांनी पैसे घेतले जाण्याला कधीही परवानगी दिली नाही. विदर्भातील बनावट शिक्षक भरतीचा प्रकरण चर्चेत येत असताना शिक्षण अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गडकरी म्हणाले, शिक्षण अधिकारी शाळेतील दौरे करत नाहीत किंवा केवळ औपचारिकता म्हणून काम करतात. यामुळे शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता धोक्यात येते. शिक्षण क्षेत्र हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, असा विचार गडकरी यांनी व्यक्त केला.
भ्रष्टाचारामुळे शिक्षणाचा दर्जा खालावला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला. शिक्षण संस्थांनी पारदर्शकता आणि गुणवत्ता या बाबतीत कटिबद्ध राहावे. केवळ नफ्याचा विचार न करता, समाजाच्या विकासासाठी शिक्षण संस्थांनी आपले योगदान द्यावे, असेही त्यांनी म्हटले. शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून त्यांची निवड नैतिकतेने आणि पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. गडकरी यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन, शिक्षक, पालक आणि समाज या सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याचा आग्रह केला.विदर्भात सुरू असलेल्या बोगस शिक्षक भरती प्रकरणाने संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर काळा पडल्याचे स्पष्ट झाले असून यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे.
Nitin Gadkari : मी मागे लागलो तर… केंद्रीय मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना इशारा