राज्यातील वाढत्या महिला आणि बालकांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांवर सरकारनं ठोस पावलं उचलली आहेत. ‘ऑपरेशन शोध’ आणि ‘ऑपरेशन मुसकान’ या मोहिमांद्वारे हजारो हरवलेल्यांना पुन्हा उजेडात आणण्यात यश मिळालं आहे.
एक काळ असा होता की एखादी स्त्री किंवा बालक घरातून बेपत्ता झाले की, त्यांचं अस्तित्वच विस्मरणात जायचं. समाज त्यांना लवकरच विसरायचा. पोस्टरवर, वर्तमानपत्रात त्यांची हळूहळू फक्त छायाच राहायची. अनेकांच्या फाईली बंद होऊन जात असत. पण आता हे चित्र झपाट्याने बदलत आहे. कारण आता या हरवलेल्या चेहऱ्यांसाठी सरकारचा सक्षम आणि संवेदनशील हात पुढे आलेला आहे.
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महिला आणि बालकांच्या बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांवर जोरदार चर्चा झाली. या चर्चेचा केंद्रबिंदू ठरले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. त्यांनी विधान परिषदेत माहिती दिली की राज्यात लहान मुलांसाठी ‘ऑपरेशन मुसकान’ उपक्रम हाती घेण्यात आले आहे. त्यात आत्तापर्यंत तब्बल 41 हजार 193 बालकांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. विशेष म्हणजे न्यायालयानेही या उपक्रमाची दखल घेत समाधान व्यक्त केलं आहे.
Abhijit Wanjarri : शिक्षक भरतीतील तांत्रिक अडचणींचा आमदारांनी केला भांडाफोड
घरच्यांकडूनही येते अनास्था
महिलांच्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की ‘ऑपरेशन शोध’ ही स्वतंत्र मोहीम राबवण्यात येत आहे. कारण अभ्यासातून असं लक्षात आलं की बहुतांश बेपत्ता महिला 95 ते 96 टक्के प्रकरणांत सापडतात, मात्र उरलेल्या 4 टक्क्यांच्या बाबतीत दीड वर्षांहून अधिक काळ जातो आणि त्यांच्याबाबतचा पाठपुरावा थांबतो. घरच्यांकडूनही या प्रकरणांत अनास्था येते आणि पोलिसांनाही नवीन प्रकरणं हाताळावी लागतात. त्यामुळे या दुर्लक्षित प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘मिसिंग सेल’ स्थापन करण्यात येणार आहे.
या मिसिंग सेलचं नेतृत्व एपीए दर्जाच्या महिला अधिकाऱ्याकडे असेल. त्यांचं मार्गदर्शन महिला सुरक्षा विभागाच्या एडीजी पातळीवरील आयपीएस अधिकारी करतील. या सेलचं एकमेव उद्दिष्ट असेल, हरवलेल्या महिला आणि बालकांच्या केसेसचा सातत्याने तपास करणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणणे.
Ashish Jaiswal : ‘समतोल’ विसरलात तर विकासाचे गणित शून्य होईल
यशस्वी शोध मोहीम
या प्रयत्नांचा परिणामही दिसू लागला आहे. अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत, 17 एप्रिल ते 15 मे 2025. दरम्यान ‘ऑपरेशन शोध’च्या माध्यमातून 4 हजार 960 हरवलेल्या महिलांचा आणि 1 हजार 364 बालकांचा यशस्वी शोध लावण्यात आला. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या कालावधीत 106 महिला आणि 703 बालक असे सापडले, ज्यांच्या हरवण्याची तक्रारच कुठेही दाखल नव्हती. ते सामाजिक विस्मरणात हरवले होते. पोलिसांनी त्यांचं अस्तित्व पुन्हा अधोरेखित केलं.
‘ऑपरेशन शोध’ आणि ‘ऑपरेशन मुसकान’ ही केवळ पोलिसी यंत्रणेची मोहीम नसून, संवेदनशीलतेची एक नवी चळवळ आहे. हरवलेल्यांना केवळ शोधून आणण्यापुरती ही मोहीम नाही, तर त्यांच्या अस्तित्वाला समाजात पुन्हा मान्यता देण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी मिसिंग म्हणजे फाईल बंद होणं, केस थंड होणं. पण आता ‘मिसिंग’ म्हणजे शोध सुरू आहे. यामार्फत राज्य सरकार आणि पोलीस दल एक नवा संदेश देत आहेत, हरवलेल्यांना विसरायचं नाही, शोधत राहायचं.