राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या मराठी-अमराठी भाषाविषयक वक्तव्यावरून आणि विरोधकांकडून आलेल्या वाढदिवसा दिनी शुभेच्छांवरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. संविधानिक पदांवर असलेल्या व्यक्तींना राजकीय वादात ओढणे हे योग्य नाही, असं ते ठामपणे म्हणाले.
एखाद्याच्या वाढदिवशी दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा या सौजन्याच्या आणि सहअस्तित्वाच्या भावना असतात, त्या राजकीय संकुचिततेच्या चष्म्यातून पाहू नयेत, असं स्पष्ट आणि ठाम मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. विरोधी विचारसरणी ही वैचारिक लढाई असते, वैर नाही, असा दिलासादायक संदेश त्यांनी दिला. फडणवीस यांनी सध्याच्या राजकीय गरळलेल्या वातावरणात सौजन्यतेचं महत्व अधोरेखित केलं आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पाठवलेल्या शुभेच्छा काही माध्यमांमध्ये राजकीय संकेत म्हणून रंगवण्याचा प्रयत्न झाला. त्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती ही परस्परांमध्ये आदर राखणारी आहे. जन्मदिवस किंवा कोणत्याही वैयक्तिक क्षणांमध्ये शुभेच्छा देणं ही माणुसकीची भावना आहे. त्यातून राजकीय अर्थ काढणे हे संकुचितपणाचं द्योतक आहे.
Parinay Fuke : टिळकांचा वारसा आता नितीन गडकरींच्या कृतीत झळकणार
सौजन्याने शुभेच्छा
फडणवीस पुढे म्हणाले, जन्मदिवसाच्या निमित्ताने माझ्यावर एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आणि त्या पुस्तकात दोन प्रमुख नेत्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यांनी केवळ सौजन्याने शुभेच्छा दिल्या. मी त्यांचे आभार मानतो, पण याला वेगळा रंग देणे म्हणजे आपल्याच संस्कृतीवर कालिमा फासणं आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नुकतेच मराठी-अमराठी भाषावादावर भाष्य करताना, कोणी मला मारहाण केली, तर मी लगेच मराठी शिकतो का? असा रोखठोक सवाल विचारला होता. यावरही फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली. राज्यपाल हे राज्यातील संवैधानिक प्रमुख आहेत. त्यांच्या वक्तव्यांचा राजकीय वादात उपयोग करणे योग्य नाही. त्यांनी समाजातील वास्तवावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना राजकीय वादात ओढू नये, असं फडणवीस म्हणाले.
Vijay Wadettiwar : हनी ट्रॅपच्या जाळ्यात माशे नव्हे, शार्क अडकले
भान विसरलो नाही
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी संयम ठेवत उत्तर दिलं. मी आज संतांच्या पावन भूमीत आहे. येथे कोणतंही राजकारण नको. संतांचं कार्य मोठं आहे आणि त्यांची शिकवण शांतता, संयम आणि समावेश याची आहे. त्यामुळे या वेळी राजकीय मुद्द्यांवर बोलणं योग्य ठरणार नाही, असे त्यांनी नम्रतेने उत्तर दिलं. पंढरपूरच्या विकासासाठी आखण्यात आलेल्या भव्य विकास आराखड्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, आपण कोणालाही दूर सारून नाही, तर सर्वांना सोबत घेऊन विकास साधायचा आहे. कोट्यवधी वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या या पावन भूमीचा चेहरामोहरा बदलणार आहे, पण तो कोणाच्याही आश्रूंच्या किमतीवर नाही. त्यांनी स्पष्ट केलं की, कोणाचे घर, दुकान बाधित झाल्यास त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था आदराने आणि सामंजस्याने केली जाईल. पंढरपूर विकास कॉरिडोर म्हणजे योजनेच्या नावाखाली कोणावर अन्याय होणार नाही. हे काम पारदर्शकपणे होईल.
विकास आराखड्यासंदर्भात जनतेच्या मनात असलेल्या शंका दूर करत फडणवीस म्हणाले, कॉरिडोर संदर्भात सर्व काम खुले आहे. कुठेही लपवाछपवी नाही. सरकारच्या अधिकाऱ्यांनी सर्व बाधितांशी थेट संवाद साधले आहेत. प्रश्नावलीद्वारे त्यांची मते जाणून घेतली आहेत. जे या कामामुळे प्रभावित होतील, त्यांच्यासोबत चर्चा करण्यास मी स्वतः तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पंढरपूर दौरा म्हणजे केवळ एक राजकीय भेट नव्हती. ती होती, सहिष्णुतेच्या आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांना पुन्हा अधोरेखित करणारी यात्रा. शुभेच्छांमधून राजकारण शोधण्याऐवजी, सहवेदनेने समाज जोडण्याचा संदेश त्यांनी दिला. श्री विठ्ठलाच्या पावन नगरीतून उच्चारलेला हा विकासाचा आणि सौजन्यतेचा मंत्र महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक संस्कृतीला नवा आशय देतो आहे.