भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांसाठीचा सत्ता-सहकाराचा थरार आता शिगेला पोहोचला आहे. मतपेटीत दडलेलं सामर्थ्य, तर मतदारांच्या मनात सत्ता पलटवणाऱ्या समीकरणांची कुजबुज सुरू आहे.
भंडारा जिल्ह्यात सध्या राजकारण, सहकार आणि सत्तेच्या समीकरणांचा अनोखा संगम पाहायला मिळत आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला महिना उलटून गेला असला तरी अध्यक्षपदावर कोण विराजमान होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. याच काळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय तापमान चांगलेच वाढवले आहे. बँक आणि दूध संघ ही दोन सत्ता-केंद्रे सध्या स्थानिक राजकारणाचे भविष्य ठरवणारी ठरत आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीने अनेक नवनिर्वाचित संचालक, नेते आणि कार्यकर्त्यांना पूर्णपणे गुंतवून ठेवले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीला विलंब झाला असून ती बँक निवडणुकीनंतरच पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सहकार क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या मते, संचालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच अध्यक्षपदाची तारीख निश्चित केली जाणार आहे.
स्थानिक राजकारणाचा किंगमेकर
या साऱ्या गदारोळात, झेडपीचं तिकीट नाही दिलंत तरी चालेल, पण बँकेचा किंवा दूध संघाचा संचालक करा, अशी मागणी भंडाऱ्याच्या राजकारणात अनेकांनी उघडपणे मांडली आहे. कारण अगदी सोपं आहे, जिल्हा बँक आणि दूध संघ हे केवळ सहकारी संस्था नसून राजकीय पायाभूत केंद्रे आहेत. जो या संस्था ताब्यात घेतो, तो स्थानिक राजकारणात किंगमेकर ठरतो. या संस्थांचे नियंत्रण लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही निर्णायक ठरत असल्याने, यावर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच गट झटत आहेत.
रविवार, 27 जुलै रोजी होणाऱ्या मतदानात जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एकही जागा बिनविरोध गेलेली नाही हे विशेष. 1062 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर उत्साह पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी पाच मतदान केंद्रे भंडाऱ्यात असून उर्वरित सात तालुकास्तरांवर स्थापन करण्यात आली आहेत.
पाहुणचाराचा लाभ
या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पारंपरिक ‘सहकार पॅनल’ आणि महायुतीच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन शेतकरी पॅनल’मध्ये थेट लढत रंगली आहे. या लढतीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात कंबर कसली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहेत. काही मतदार सध्या देवदर्शनाच्या नावावर शहराबाहेर गेले आहेत, तर काहीजण उमेदवारांच्या पाहुणचाराचा लाभ घेत आहेत. त्यामुळेच सहकारात ‘देवदर्शनासोबत लक्ष्मी दर्शन’ सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
ही निवडणूक दिग्गज नेत्यांसाठीही प्रतिष्ठेची बनली आहे. दूध संघ गटातून विद्यमान अध्यक्ष सुनील फुंडे विरुद्ध खासदार प्रशांत पडोळे, मजूर संघातून कैलाश नशीने विरुद्ध भ. सु. खंडाईत, ओबीसी गटातून नाना पंचबुद्धे विरुद्ध डॉ. चंद्रकांत निंबार्ते, तसेच विवेक पडोळे यांच्यासारख्या नावाजलेल्या व्यक्ती थेट रिंगणात आहेत. विविध तालुक्यांतूनही बडे चेहरे आमनेसामने आले असून, साकोली, लाखांदूर, पवनी, तुमसर आणि भंडारा तालुक्यात थेट लढतीचं चित्र आहे.
विविध मतपत्रिका
या निवडणुकीसाठी विविध मतदारसंघासाठी रंगीत मतपत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. सेवा सहकारी सोसायटीसाठी पांढऱ्या रंगाची, अनुसूचित जाती-जमातीसाठी फिकट निळी, वि.जा.भ.ज., वि.मा.प्र.साठी फिकट हिरवी, ओबीसीसाठी पिवळी तर महिला मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. मतदारांनी या मतपत्रिकांच्या आधारे मतदान करायचं आहे.
दरम्यान, एका मतदाराच्या नावावरून न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतदानाला हरकत घेतली नसली तरी निकाल मात्र याचिकेवरील निर्णयानंतरच जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे मतदानानंतरही निकालासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
महायुती खंबीर
या निवडणुकीत महायुतीकडून खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात मोर्चेबांधणी झाली असून आमदार परिणय फुके, राजू कारेमोरे, नरेंद्र भोंडेकर व सुनील फुंडे यांच्यासारखे प्रभावशाली नेतेही मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे काँग्रेसच्या सहकार पॅनलनेही प्रचारात मोठ्या प्रमाणात ताकद लावली असून, पारंपरिक सहकारी मदारांची मते खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकूणच, भंडाऱ्यातील जिल्हा बँक निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रातील निवडणूक नसून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी निर्णायक लढत ठरणार आहे. मतपेटीत दडलेलं भविष्य आता मतदानाच्या रुपाने उलगडणार आहे – पण निकालाच्या क्षणापर्यंत राजकीय समीकरणं आणि चर्चा शिगेला पोहोचणार यात शंका नाही!